
पीओपीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू ठेवण्यावर मुंबई महापालिका ठाम असून मुंबईत पीओपी मूर्तीवर बंदी कायम असेल, असे मुंबई महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईबाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालिका मुख्यालयात गुरुवार, 24 एप्रिलला मूर्तिकारांच्या सर्व संघटनांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाला चार महिने शिल्लक असताना मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. मूर्तिकारांना यंदाही शाडूची माती विनामूल्य दिली जाणार आहे. मूर्तीचे आगमन, विसर्जन सुकर होईल एवढय़ा उंचीची मूर्ती साकारण्यात यावी, अशी अटही पालिकेने घातली आहे.
मूर्तिकारांमध्ये संभ्रम
माघी गणेशोत्सवावेळी पीओपीच्या मूर्ती असल्यामुळे मुंबई महापालिकेने गणेशमूर्तीचे विसर्जन रोखून धरले होते. महापालिकेच्या या भूमिकेमुळे मुंबईतील मानाच्या अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणपतींचे विसर्जन केले नाही. त्यामुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात आता गणेशोत्सवाला चार महिने राहिले असतानाही अजूनही मूर्तिकारांनी मूर्ती घडवायला सुरुवात केलेली नाही. यंदा मूर्ती पीओपीच्या की शाडूच्या घडवायच्या या संभ्रमात मूर्तिकार आणि मूर्तिकार संघटना आहे. दरम्यान, पालिकेने आम्हाला योग्य तो पर्याय द्यावा, अशी मागणी मूर्तिकार संघटनांनी केली होती. त्यामुळे गुरुवारी पालिका मुख्यालयात होणारी बैठक ही महत्त्वाची मानली जात आहे.