मुंबईमध्ये वाढणाऱ्या प्रदूषणाला बेकरींच्या शेगडीत जाळण्यात येणाऱ्या लाकूड, प्लायवूडमधील विषारी धूरदेखील कारणीभूत असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेकडून आता मुंबईभरातील सर्व बेकऱ्यांची झाडाझडती घेऊन पीएनजी आणि इलेक्ट्रिक शेगडी सुरू करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार आहे, तर एकूण बेकऱ्यांमधील निम्म्या बेकऱ्या बेकायदा असल्याचे समोर आल्याने या बेकऱ्या बंद करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर सल्लाही घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हवेची गुणवत्ता खालावण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. प्रदूषणाला मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणच्या धुळीसोबतच बेकऱ्यांमध्ये जाण्यात येणारी लाकडे आणि प्लायवूडही जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बेकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक किंवा पीएनजीवर आधारित शेगडी वापरण्याची सक्ती करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत बेकायदेशीर आणि प्रदूषणकारी बेकऱ्या बंद करण्याचे अधिकार पालिकेकडे नसल्यामुळे बेकऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशा बेकायदेशीर बेकऱ्या बंद करण्यासाठी पालिका ‘एमपीसीबी’कडून सल्ला घेणार आहे.
अशी होणार कार्यवाही
मुंबईमध्ये बेकऱ्यांना पालिकेकडून परवानगी देण्यात येते. मात्र प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 2007 पासून फक्त इलेक्ट्रिक शेगड्य़ांवर आधारित बेकऱ्यांनाच परवानगी देण्यात येते.
मात्र मुंबईत सद्यस्थितीत असलेल्या सुमारे 1200 बेकऱ्यांमधील निम्म्या बेकऱ्या बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. या बेकऱ्यांमध्ये लाकूड, प्लायवूड जाळून शेगडी पेटवली जाते.