![varsha gaikwad](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/varsha-gaikwad-1-696x447.jpg)
मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून अधिक मताधिक्याने निवडून आलेल्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना हायकोर्टाने आज मोठा दिलासा दिला. गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आज फेटाळून लावली. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांबाबत ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजप उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांचा दारुण पराभव केला. निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी 16 हजार 514 मतांनी विजय मिळवला होता. खासदार गायकवाड यांच्या विजयाला अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी आक्षेप घेत हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल केली होती. निवडणुकीत हँडबिलवर मुद्रक, प्रकाशकांच्या नावांचा समावेश केला नाही तसेच मतदारांना जाहिरात पत्रकांद्वारे खोटी आश्वासने दिली, मतदारांना पैसे वाटण्यात आले, असे आरोप याचिकाकर्त्यांनी केले होते.