
राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकावर सरकारकडून बंदी घालण्याचे कारस्थान सुरू आहे. या कारस्थानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी संसदेत जोरदार आवाज उठवला. अनिल देशमुख यांचे पुस्तक संपूर्ण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे आहे. त्यामुळे या पुस्तकावर बंदी घालण्याआधी प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे, अशी मागणी करीत फौजिया खान यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे. सरकारने अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकावर बंदी घालण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने खासदार फौजिया खान यांनी थेट राज्यसभेत देशमुख यांच्या पुस्तकाचा मुद्दा उपस्थित केला. सरकार पातळीवर वाढलेला भ्रष्टाचार हळूहळू संपूर्ण व्यवस्थाच गिळंकृत करतोय. धोकादायक पातळीवर पोचलेला भ्रष्टाचार तसेच पोलीस दल आणि राजकीय विश्वाचे झालेले गुन्हेगारीकरण यावर देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे. कनिष्ठ स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकावर बंदी घालण्याआधी प्रत्येक सदस्याने हे पुस्तक वाचलेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका फौजिया खान यांनी राज्यसभेत मांडली. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे महाराष्ट्र सरकारचे छुपे कारस्थान चव्हाटय़ावर आले आहे.
कारस्थाने झाकण्याची सरकारची खेळी!
- अनिल देशमुख यांनी 14 महिने तुरुंगात काढले. त्यांना नाहक गोवण्यासाठी कशा प्रकारे षडयंत्र रचले गेले, यावर देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ पुस्तक लिहिले. या पुस्तकातून राज्याच्या राजकारणातील कटकारस्थाने, पोलीस दलातील कारस्थाने आणि काही गाजलेल्या प्रकरणांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती लोकांसमोर येऊ नये म्हणून सरकारने पुस्तकावर बंदी घालण्याची खेळी खेळली आहे, असे बोलले जात आहे.