विक्रीअभावी शिल्लक घरे विकण्यासाठी म्हाडाची शक्कल; खोणी, शिरढोणमधील गृहप्रकल्पात शाळा, रुग्णालय उभारणार

नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या खोणी आणि शिरढोण येथील घरांकडे अर्जदारांनी पाठ फिरवली. अर्जदारांना या प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी म्हाडाने अनोखी शक्कल लढवली आहे. या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत शाळा व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांच्या विक्रीसाठी म्हाडाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येथे शाळा आणि रुग्णालयाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याव्यतिरिक्त म्हाडातर्फे या दोन्ही प्रकल्पांत कम्युनिटी हॉल, व्यायामशाळा, गार्डन, दुकाने यासारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

शिरढोणमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 7141 व म्हाडा योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी 528 घरे उभारण्यात आली आहे. या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील 11,023 घरांना मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 765.64 चौरस मीटर व 596.87 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले दोन भूखंड आहेत. तर शाळा व खेळाच्या मैदानासाठी 3033.25 चौरस मीटर व 2768.67 चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड आरक्षित आहेत. मौजे खोणी येथे म्हाडामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 5060 घरांचे बांधकाम पूर्ण झालेले असून 4048 घरांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या ठिकाणी शाळा व मैदान सर्व एकूण 2464.60 चौ.मी. क्षेत्रफळाचे भूखंड उपलब्ध आहे. इच्छुकांनी भूखंड खरेदीसाठी 18 मार्चपर्यंत https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निविदा प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.