सलग तिसऱ्या दिवशी मेट्रो -3 विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रोचे उद्घाटन झाले होते. पण सलग तीन दिवस या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड होत असून प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास 30-45 मिनिटे कुठलीही मेट्रो नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे ऑफिससाठी निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. यावेळी मेट्रो प्रशासनाने कुठलेही कारण सांगितले नाही. फक्त मेट्रो उशिरा धावत असल्याने दिलगिरी व्यक्त केल्याची घोषणा केली. पण आताच नाही तर मंगळवारीही अशाच प्रकारे मेट्रो उशिरा धावत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार सहार स्टेशनवर प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर सिस्टमध्ये बिघाड झाला होता. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही यंत्रणा पूर्णपणे स्वंयचिलत आहे. पण सध्या ही सेमी ऑटोमेटेड मोडवर सुरू आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत. जेव्हा ट्रेन ऑपरेटरला ही अडचण सोडवता येत नाही तेव्हा ट्रेन काही वेळ थांबवली जाते असे मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे.