Mumbai Metro 3 : फेक न्यूजबद्दल PMO वर कारवाई करणार का? वाचा काय आहे प्रकरण…

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि बहुप्रतीक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई ‘मेट्रो – 3’चे उद्घाटन येत्या 24 जुलै रोजी होणार असल्याचे बुधवारी केंद्र सरकारच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरून जाहीर करण्यात आले. नंतर हे ट्वीट डिलिट करण्यात आले. यावरून सामाजिक तसेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालय (PMO) या फेक न्यूजबद्दल कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाइन, ‘अक्वा लाइन’ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ), 24 जुलै रोजी सुरू होणार आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या 33.5 किमी मार्गाच्या मेट्रोसाठी 27 थांबे आहेत, असे ट्वीट @mygovindia या केंद्र सरकारच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरून केले होते. पण कालांतराने केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट डिलिटही करण्यात आले. पण त्यापूर्वी भाजपा नेत्यांसह अनेक मान्यवरांनी आपापल्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरून त्याची माहिती दिली होती.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या खुद्द सरकारकडूनच प्रसारित झालेल्या ‘फेक न्यूज’ला आक्षेप घेतला आहे. मुंबईची पहिला भूमिगत मेट्रो मार्ग 24 जुलैपासून सुरू होणार आहे, अशी फेक न्यूज भारत सरकारच्या ट्विटवर देण्यात आली होती आणि त्यावर सगळ्यांचा विश्वास बसला होता. त्यानंतर विनोद तावडे यांच्यासह इतर मान्यवर या फेक न्यूजच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे पीएमओ यावर कारवाई करेल का? असा प्रश्न गलगली यांनी विचारला आहे.

Screenshot of Tawde’s deleted post on X, screenshot of Central government’s deleted post on X

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी भूमिगत मेट्रो खूप फायदेशीर ठरणार आहे. मेट्रो रेल – 3 या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर 2016 पासून सुरुवात झाली. मेट्रो रेल प्रकल्पात एकूण 27 स्थानके असून कुलाबा -वांद्रे -सीप्झ मेट्रो-3 मार्गिकेतील पहिले स्थानक कफ परेड तर शेवटचे स्थानक आरे राहणार आहे. 27 स्थानकांपैकी आरे हे एक स्थानक जमिनीवर असून बाकी सर्व स्थानके भूमिगत असणार आहेत. बीकेसी ते आरे हा 12.44 किमीचा पहिला टप्पा ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर पुढील पाच ते सहा महिन्यांत संपूर्ण मेट्रो रेल मुंबईकरांच्या सेवेत आणण्यायाचे प्रयत्न असल्याची माहिती मेट्रो रेल प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे 37,275.82 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.

एका फेरीत 2500 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. सकाळी 6.30 ते रात्री 11 अशा वेळेत मेट्रोची सेवा असेल. मेट्रोचा ताशी वेग 90 कि.मी. राहणार असल्याने जलद प्रवास होणार आहे. मेट्रोमुळे दोन तासांचा प्रवास अवघ्या 50 मिनिटांत होणार आहे. मेट्रो रेलच्या ताफ्यात सध्या 22 गाडय़ा दाखल झाल्या आहेत. यापैकी नऊ गाडय़ा पहिल्या फेजमध्ये प्रवासी सेवेत दाखल होतील.

अशा राहणार सुविधा

या प्रकल्पात सरकते जिने, लिफ्ट, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि प्रवासी माहिती डिस्प्लेची सुविधा, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअरसाठी आरक्षित जागा, स्वच्छतागृह, महिलांसह प्रथमच पुरुषांच्या स्वच्छतागृहांत लहान बाळांसाठी डायपर बदलण्याची सोय, स्थानकांवरील गर्दीच्या वेळी आवश्यकतेनुसार तेथील एअर पंडिशन आणि दिव्यांच्या उपलब्धतेत बदल अशा सुविधा देण्यात येतील.

ही आहेत 27 स्थानके

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुझ, देशांतर्गत विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो ही स्थानके आहेत.