
मुंबई गोदीत 80 वर्षांपूर्वी घडलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलातील अनेक जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभरात 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो. त्याचबरोबर मुंबईत 14 ते 20 एप्रिल हा कालावधी अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, मुंबईकरांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागृती व्हावी, यासाठी आज मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली.
मुंबईतील गोदीत 4 एप्रिल 1944 रोजी लागलेल्या भीषण आगीत मुंबई अग्निशमन दलातील 66 अग्निशमन कर्मचाऱयांना वीरमरण आले. या शहीद जवानांना आदरांजली व त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 14 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशात अग्निशमन सेवा दिवस म्हणून पाळला जातो. मुंबईच्या जनतेत अग्निसुरक्षेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने ‘अग्निशमन सेवा सप्ताह’निमित्ताने परिमंडळ-3 मध्ये ‘अग्निसुरक्षा जनजागृती’ रॅली काढण्यात आली. यावेळी मुंबई उपअग्निशमन प्रमुख एच. आर. शेट्टी यांनी रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली वांद्रे अग्निशमन केंद्र, एस. व्ही. रोड मार्गे आणि लिकिंग रोड मार्गे, खार पश्चिम, सांताक्रुझ पश्चिम, विलेपार्ले पश्चिम मार्गाने अंधेरी अग्निशमन केंद्र अशी ही रॅली काढण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाच्या विविध अत्याधुनिक वाहने, साधनसामग्री याबाबत मुंबईकरांना माहिती व्हावी आणि अग्निसुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी एच. व्ही. गिरकर, विभागीय अग्निशमन अधिकारी एम. वाय. मिठबावकर, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी बंडगर, तळेकर, सुरेंद्र सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.