महिलेचा विनयभंग करणारा गजाआड

महिलेचा पाठलाग करून तिचा व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर व्हायरलची धमकी देणाऱयाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. बाबर रहेमत खान असे त्याचे नाव आहे. बाबरने पोलीस ठाण्यात पोलिसांशी धक्काबुकी केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार महिला या सांताक्रुझ येथे राहतात. आज पहाटे त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत वांद्रे रिक्लेमेशन गार्डन येथे फिरण्यास आल्या. होत्या. तेव्हा त्याने महिलेचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. शिवीगाळीनंतर तो महिलेच्या अंगावर धावून आला. महिलेला स्पर्श करून तिला धक्का दिला. तसेच बाबरने महिलेचा पाठलाग करून व्हिडीओ केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी त्याने धमकी दिली. घाबरलेल्या अवस्थेत महिलेने याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली. काही वेळात वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी बाबरला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याने मोठमोठय़ाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दोन पोलिसांसोबत त्याने हुज्जत घातली. एवढय़ावर न थांबता त्याने पोलिसासोबत झटापट करून वर्दीची लायनार्ड तोडली. घडल्या प्रकरणी बाबरविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली.