ओव्हरहेड वायरवर रेनकोट फेकल्याने वाहतुकीला फटका, चर्चगेट स्थानकात RPF जवानांची तारांबळ

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात एका विचित्र कारणाने रेल्वे वाहतूक खोळंबली होती. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील ओव्हरहेड वायरवर रेनकोट अडकल्याने सोमवारी पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणाने समोरच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या त्याच्या मित्राला रेनकोट देण्यासाठी फेकला. मात्र, तो रेनकोट ओव्हरहेड वायरवर अडकला. त्यामुळे चर्चगेट स्थानाकात सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प होती. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे 15 ते 20 मिनिटे खोळंबली होती. या प्रकरणी रेनकोट फेकणाऱ्या तरुणाला दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, चर्चगेट रेल्वे स्थानकावर सुमित भाग्यवंत (19) या तरुणाने समोरच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या मित्राला रेनकोट देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने तो फेकला. मात्र रेनकोट थेट ओव्हरहेड वायरला अडकला. प्रसंगावधान राखत कामावर असलेल्या आरपीएफच्या जवानांनी ओव्हरहेड वायरवर अडकलेला रेनकोट तातडीने काढला. त्यामुळे फलाट क्रमांक तीनवरील लोकल सेवा 25 मिनिटे ठप्प झाली होती.तर या मार्गावरील सर्व लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. या प्रकरणी सुमितला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.