लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग; वृद्ध दाम्पत्यासह नोकराचा मृत्यू, शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता

अंधेरी पश्चिम लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील 14 मजली इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्यासह नोकराचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रप्रकाश सोनी (74), कांता सोनी (74) आणि पेलुबेटा (42) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंधेरी पश्चिम येथील प्रसिद्ध लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये ’रिया पॅलेस ’ ही 14 मजली रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये दहाव्या मजल्यावर बुधवारी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांची घबराट उडाली. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले.

आगीच्या धुरामुळे  वृद्ध दांपत्य आणि त्यांचा नोकर पेलुबेटा हे तिघेजण जखमी झाले. त्यांना तत्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून एक फायर इंजिन आणि एक जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने 50 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेचा तपास स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाकडून सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

फायर फायटिंग सिस्टम सुरू

या दुर्घटनेत मृत पावलेले चंद्रप्रकाश सोनी यांची लोखंडवालामध्ये शिपिंग कंपनी होती. त्यांची मुले कामानिमित्त परदेशात राहत आहेत. तर त्यांच्या मदतीसाठी पेलुबेटा याची नेमणूक करण्यात आली होती. मात्र आगीच्या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित इमारतीत फायर फायटिंग सिस्टम सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.