
धुराड्यांमधून निघणाऱ्या घातक वायूंमुळे वाढणारे प्रदूषण आणि धुरामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दमा, टीबी आणि पॅन्सरसारख्या आजारांचा धोका असल्याचे समोर आल्यामुळे महालक्ष्मीच्या धोबीघाटमधील धुराडी लवकरच बंद करण्यात येणार आहेत. या ठिकाणी धुराडय़ांऐवजी पीएनजी गॅसचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेकडून कार्यवाही सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असणारा धोबीघाट 81.49 चौरस मीटर असून 2011 मध्ये जगातील सर्वात मोठा धोबीघाट असा गौरव ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी काम करणारा धोबी समाज हा ‘धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्यादित’ संलग्न आहे. या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करणाऱया कामगारांचे प्रश्न सोडवले जातात. मात्र या ठिकाणी कपडे वाळवणे, कपड्यांना इस्त्री करणे आणि भट्टीमध्ये सर्रासपणे लाकडे, चिंध्या, टाकाऊ कापड, एलपीजी सिलिंडर आणि प्लॅस्टिकचाही वापर करण्यात येतो. मात्र हे पदार्थ जाळल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे या ठिकाणची धुराडी बंद करून पीएनजी गॅस वापरण्याची कार्यवाही प्रशासकीय स्तरावर केली जात आहे.
पालिका खर्च करणार 24 कोटी
महालक्ष्मी धोबीघाट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या कामासाठी पालिकेच्या माध्यमातून 24 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी ओशिपॅनिक इंजिनीअर्स अॅण्ड कन्सल्टंन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे.