पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा, अनेक गाड्या रखडल्या; रेल्वेने दिले स्पष्टीकरण

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकलची पश्चिम रेल्वे मार्गावारील सेवा कोलमडली आहे. सहाव्या मार्गिकेचे काम आणि इतर तांत्रिक बाबींमुळे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे धीम्या गतीने धावत आहेत. त्यातच आता मंगळवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. जलद मार्गावर अनेक लोकल रखडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुपारी 4.30 वाजेनंतर सुमारे अर्धा तास माटुंगा रोड ते वांद्रे स्थानकादरम्यान अनेक लोकल थांबल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतूक रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

सुमारे 4.30 वाजेपासून मुंबईतील पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेवर काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने जलद मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि विरारकडे जाणाऱ्या दोन्हीही दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला आहे. अनेक लोकल गाड्या या बोरिवली, विरार, वसई, वांद्रे, जोगेश्वरी, दादर यांसह विविध ठिकाणी थांबल्या आहेत. या ट्रेन साधारण 30 ते 35 मिनिटे उशीराने धावत आहेत. अनेक एसी लोकलही उशीराने सुरु आहेत. अनेक प्रवाशांनी याबद्दल ट्वीटरवर तक्रार नोंदवली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे लोकल उशिराने धावत आहेत. किती वाईट सेवा आहे, असा प्रश्न एका प्रवाशाने विचारला आहे. त्यावर पश्चिम रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ट्रॅक देखभालीचे काम सुरु आहे. त्यामुळे ट्रेनच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक ट्रेन या उशीराने धावत आहे. तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करत आहोत, असे पश्चिम रेल्वे म्हटले आहे.