मुंबई लोकल: धारावीत रविवारी मोफत वैद्यकीय शिबीर

पसायदान या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नवजात शिशू ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी रविवार, 22 डिसेंबरला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धारावी येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. मुंबईतील प्रसिद्ध वाडिया रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने हे शिबीर होणार आहे. धारावीतील जीवनज्योत रहिवासी सेवा संघ, धोबीघाटजवळ, बिट क्रमांक 1, पोलीस चौकीजवळ, एम. जी. येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क-9594182526.

विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे शिबीर

विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे 56 वे शैक्षणिक शिबीर शुक्रवार, 27 ते रविवार, 29 डिसेंबर या कालावधीत तेली समाज हॉल, वेताळबांबार्डे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी बाजाली शेवाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शनिवार, 28 डिसेंबरला सकाळी 8 ते दुपारी 1 या कालावधीत श्रीदेवी भगवती देवस्थान धामापूर, कलेश्वर देवस्थान, लक्ष्मीनारायण मंदिर वालावल आदी स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. त्यावेळी कोकणचे महत्त्व पटवून देणारे ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे, संदीप साळसकर सोबत असणार आहेत. तसेच सायंकाळी 6 ते 9 या वेळेत नवदीप बालकलाकार, भाडय़ाची वाडी, कुडाळ यांचा कोकणची लोककला दशावतार हा कार्यक्रम सादर होणार आहे. संपर्क – शिबीर प्रमुख दिलीप केळंबेकर (9221072181) आणि मंडळ प्रमुख शैलेंद्र राणे (9920570940) यांनी केले आहे.

शिवसेना मलबार हिल विधानसभा व जीवन ज्योत ड्रग बँक यांच्या वतीने नेत्र चिकित्सा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा, लेसिक, रेटिना अशा आजारांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, राजकुमार बाफना, सिनेट सदस्य किसन सावंत, समाजसेवक भैरूभाई चौधरी, मलबार हिल विधानसभा संघटक अरविंद बने, सुरेखा उबाळे, शोभा जगताप, युवासेना विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर, कुलाबा संघटक कृष्ण पोवळे, मुंबादेवी समन्वयक दिलीप सावंत, शाखा उपविभागप्रमुख सुजित राणे, किरण बाळसराफ, शाखाप्रमुख प्रभाकर कष्टे, महिंद्रा कांबळे, संघटक सुप्रिया शेडेकर, मीना आंधळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मार्गदर्शन विभागप्रमुख संतोष शिंदे आणि विभाग संघटक, युगंधरा साळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मलबार हिल सहसमन्वयक सिद्धेश माणगावकर यांनी केले.

शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित के. पी. पूर्व विभाग वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रमिक विद्यालय आणि वाय. बी. सी. इंग्रजी माध्यमाची बाजी मारली. या प्रदर्शनात या वर्षी 17 बक्षिसे पटकावून पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. यावेळी शाळेच्या संचालिका स्मिता चव्हाण यांनी मुख्याध्यापिका मीनल सरकाळे यांच्यासह सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.