
क्रीडा संहितेची अंमलबजावणी न करता गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने निवडणूकीचा घाट घातला होता. मात्र या वादग्रस्त निवडणूकीला कबड्डी संघटकांच्या विरोधानंतर 9 महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै 2024ला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मुंबई शहर कबड्डी संघटनेचाही कार्यकाल जुलै 2024 लाच संपलाय. तेव्हापासून आपणही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात असल्याचे तुणतुणे वाजवत मुंबई शहर कबड्डी संघटनेची विद्यमान कार्यकारिणी कबड्डीची सत्ता उपभोगतेय. मुळात राज्य संघटना आणि मुंबई शहर संघटनेची घटना वेगवेगळी असल्यामुळे मुंबईच्या कबड्डी संघटनेला स्वताच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी राज्याच्या निवडणूकीची वाट पाहाण्याची गरजच नव्हती आणि नाहीय. हिंदुस्थानातील सर्वच क्रीडा संघटनांसाठी राष्ट्रीय क्रीडा संहिता बंधनकारकच आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुंबई शहर कबड्डी संघटनेने राज्य संघटनेच्या निवडणूकीच्या निर्णयाची वाट न पाहाता राष्ट्रीय क्रीडा संहितेनूसार निवडणूक घेऊन राज्यातील सर्व संघटनांसमोर नवा आदर्श ठेवावा, असे आवाहन कबड्डी संघटक आणि कबड्डीप्रेमींकडून करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी राज्य कबड्डी संघटनेने आपला कार्यकाळ नऊ महिने आधी संपल्यानंतर २१ जुलै २०२४ ला निवडणूक घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र कबड्डीची निम्मी निवडणूक बिनविरोध झाल्याने काही मोजक्याच पदांसाठी मतदान होणार होते. मात्र २१ जुलै आधीच राज्य कबड्डीच्या निवडणूकीवर न्यायालयाने स्थगिती आणली. त्याचदरम्यान मुंबई शहर कबड्डी संघटनेचीही पंचवार्षिक निवडणूक होणार होती. मात्र मुंबईने राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीवर आणलेल्या स्थगितीमुळे आपली नियोजित निवडणूक त्यांच्या निकालानंतर घेणार असल्याचे गेल्यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले.
मुंबई शहर कबड्डी संघटनेचा कार्यकाळ गेल्यावर्षी जूनमध्येच संपला होता. पण संघटनेने निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात वारंवार टाळाटाळ केली. तेव्हाही ते राज्य कबड्डीच्या निवडणूकीची वाट पाहात होते. मात्र जेव्हा राज्याच्या निवडणूकीवर स्थगिती आली तेव्हा त्यांनी स्थगितीचे कारण पुढे करण्यास सुरूवात केली. मग गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत पंचवार्षिक निवडणूक ही राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीनंतरच घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा संघटनेतील कुणीही त्याला विरोध केला नाही, हेच पटत नाहीय. की मुंबईच्या कार्यकारिणीने कुणाचे ऐकूनच घेतले नव्हते?जर ऐकून घेतले असते तर कार्यकारिणीला निवडणूक घ्यावी लागली असती आणि क्रीडा संहितेनूसार कार्यकारिणीतील सर्वांना घरी बसावे लागले असते. याचाच अर्थ, घरी बसावे लागणार, याच भीतीने विद्यमान कार्यकारिणी निवडणूक लांबणीवर टाकत असल्याचे कबड्डी संघटकांचे प्रामाणिक मत आहे.
आम्हाला राज्याच्या निवडणूकीची प्रतीक्षा
आम्ही पंचवार्षिक निवडणूकीसाठी सज्ज आहोत. आम्हाला फक्त राज्याच्या निवडणूकीची प्रतीक्षा आहे. त्यांच्या निवडणूकीआधी आमची निवडणूक घेणे योग्य नाही. राज्य संघटना ज्या नियमानूसार निवडणूक घेईल, त्याचे आम्हीही तंतोतंत पालन करू. आमच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असला तरी अशा विचित्र स्थितीत संघटनेची आणि मुंबईतच्या कबड्डीची जबाबदारी वाहणे, हे आमच्या कार्यकारिणीचेच कर्तव्य आहे आणि ते आम्ही सक्षमपणे पार पाडत आहोत. आम्हाला कोणाचीही भीती नाही. -विश्वास मोरे, (कार्यवाह, मुंबई शहर कबड्डी संघटना)
मुंबईने तात्काळ निवडणूक घ्यावी
मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या विद्यमान कार्यकारिणीला केवळ फुकटची सत्ता उपभोगण्यातच रस आहे. प्रत्येक वळणावर राज्य कबड्डी संघटनेच्या विरोधात उभी राहाणारी मुंबई शहर कबड्डी संघटना राज्य कबड्डीच्या ा निवडणूकीची वाट पाहतेय, हे पटतच नाही. दोन्ही कबड्डी संघटनांची घटना वेगवेगळी आहे. जर राज्यातील मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी सारख्या जिल्हा संघटना आपल्या निवडणूका घेत असतील तर मुंबई शहर कबड्डी संघटनेला कुणाची भीती वाटतेय? कार्यकाल संपून नऊ महिने झालेत. आता त्यांनी तात्काळ निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करावा. जेणेकरून कबड्डीसाठी नव्या दमाच्या क्रीडा संघटकांना निवडणूकीच्या रिंगणात उतरता येईल. – राजेश पाडावे (कबड्डी संघटक आणि प्रशिक्षक)