जुहू कोळीवाड्यात शेडखाली मच्छी सुकवणार, हायकोर्टाचा कोळी बांधवांना दिलासा, रखडलेल्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा

जुहू कोळीवाडा येथे मच्छी सुकवण्यासाठी शेड उभारण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोकळा केला. येथील सुशोभिकरणाचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर न्यायालयाने याला हिरवा कंदील दाखवल्याने येथील कोळी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

येथील सुनील दत्त पार्क समोरील मोकळ्या जागेत आरसीसी शेडचे बांधकाम होणार आहे. कोळी बांधवांना मच्छी सुकवता यावी यासाठी खास ही शेड ही उभारली जाणार आहे. एमसीआरझेडएमने यासाठी परवानगी दिली होती. सीआरझेडने न्यायालयाची परवानगी घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबई झोपडपट्टी सुधारणा मंडळाने अॅड. अक्षय शिंदे यांच्या मार्फत याचिका दाखल केली.

मुख्य न्यायमूर्ती अलोक आरधे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. कोळीवाडा जवळील भूखंड सीआरझेड-2 मध्ये मोडत नाही. यासाठी परवानगीची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले व ही याचिका निकाली काढली.

आठ हजार हेक्टरवर सुशोभीकरण

कोळीवाडय़ाजवळील सुमारे आठ हजार हेक्टर भूखंडावर सुशोभिकरण केले जाणार आहे. जॉगिंग ट्रक, आसन व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, अशा पद्धतीने जुहू कोळीवाडय़ाचा विकास केला जाणार आहे. मच्छी सुकवण्यासाठी शेड बांधली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या झोपडपट्टी सुधारणा मंडळाने घेतल्या. या सर्व कामासाठी न्यायालयाची परवानगी घ्या, असे सीआरझेडने मंडळाला सांगितले होते.

तिवरे नाहीत

या जागेत तिवरे नाहीत. परिणामी सुशोभिकरण व शेडच्या बांधकामाने पर्यावरणाला बाधा होणार नाही, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयात स्पष्ट केले.