जे. जे. उड्डाणपुलावर मोठा अनर्थ टळला शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, दोन विद्यार्थी व क्लीनर जखमी

जे. जे. उड्डाणपुलावर आज सकाळी मोठा अनर्थ टळला. शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला. बस लोखंडी रॅलिंगला धडकून विरुद्ध मार्गावर गेली. यात बसचा क्लीनर व दोन विद्यार्थी जखमी झाले. तिघांचीही प्रकृती स्थिर असून पायधुनी पोलिसांनी बसचालकास अटक केली.

अंजुमन ए इस्लाम अल्लाना इंग्लिश शाळेची बस सकाळी 6.30 च्या सुमारास 18 विद्यार्थ्यांना घेऊन जे. जे. उड्डाणपुलावरून शाळेच्या दिशेने निघाली होती. बस दादा मेन्शनसमोर आली असता चालक लालुकुमार राजभर (24) याने पुढे असलेल्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परिणामी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस लोखंडी रॅलिंगला आदळून विरुद्ध मार्गावर जाऊन थांबली. बस रॅलिंगवर आदळल्यावर क्लीनर बसच्या बाहेर फेकला गेला, तर बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले. एक विद्यार्थी व क्लीनरला तत्काळ जे. जे. इस्पितळात दाखल केले, तर दुसऱया विद्यार्थ्याला शिवडी नार्ंसग होम येथे दाखल केले. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे पायधुनी पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बेदरकार व हयगयीने बस चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी भा.दं.वि. कलम 279, 338 सह कलम 184, 184 मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून बसचालक लालुकुमार यास अटक केली आहे. अपघात झाला तेव्हा सुदैवाने वाहनांची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी घटना टळली. याप्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करीत आहेत.