सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. हौशी मुंबईकरांनी मित्रमंडळी, नातेवाईकांच्या सोबतीने ‘थर्टी फर्स्ट’निमित्त पार्टीचे बेत आखले आहेत. यासाठी नामांकित हॉटेल्स, रेस्तराँचे ‘अॅडव्हान्स बुकिंग’ही केले आहे, तर बहुसंख्य मुंबईकर नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबासोबत चौपाटी गाठणार आहेत. संपूर्ण शहर ‘थर्टी फर्स्ट’च्या हाऊसफुल्ल उत्साहाने भारलेले राहणार असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
शहरात गेले चार दिवस धुरक्याचे साम्राज्य होते. सोमवारी त्याची तीव्रता कमी झाली आणि पुन्हा हवेत सुखद गारवा पसरला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या ’थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईकरांचा हा उत्साह, आनंद द्विगुणित करण्यासाठी पालिका, बेस्ट, रेल्वे प्रशासन व इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मोठय़ा प्रमाणावर मुंबईकर ’पार्टी फर्स्ट’ म्हणत नववर्षांच्या पूर्वसंध्येला घराबाहेर पडतात. त्यांच्या सोईसाठी हॉटेल्स, मॉल्समध्ये वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या आहेत.
रेस्तराँ, पब पहाटे 5 पर्यंत खुले
‘थर्टी फर्स्ट’ची रात्र म्हटले कि मुंबईत ’नाईटलाईफ’चा उत्साह ठरलेला. यानिमित्ताने हजारो मद्यप्रेमींच्या सुरक्षेची काळजी हॉटेल्सचालक घेणार आहेत.
तगडा बंदोबस्त
सरकारने मद्यविक्रीची वेळ वाढवली आहे. त्यातून अनुचित प्रकार घडण्याची तसेच ’ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या प्रकारांची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत पोलिसांनी शहरभर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. कोम्बिग ऑपरेशनसह नाकाबंदी सुरु केली आहे. चौपाटीवरही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
लोकलच्या तीनही मार्गांवर विशेष फेऱ्या
लोकलही मुंबईकरांसाठी संपूर्ण रात्रभर धावणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सीएसएमटी ते कल्याण, तर हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवर पहाटेपर्यंत चर्चगेट ते विरारदरम्यान लोकलच्या एकूण आठ विशेष फेऱया धावणार आहेत.
हेरिटेज टूरसाठी 3 वाजेपर्यंत सेवा
बेस्ट उपक्रमाकडून ऐतिहासिक तसेच प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडविण्याच्या हेतूने हेरिटेज टूर चालविण्यात येणार आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) – गेट वे ऑफ इडिया – मंत्रालय एनसीपीए नरीमन पॉइंट, विल्सन कॉलेज नटराज हॉटेल चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, रिझर्व्ह बँक ओल्ड कस्टम हाऊस म्युझियम या मार्गावर सकाळी 10 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत प्रत्येकी 45 मिनिटांच्या प्रस्थानानंतर या बस गाडय़ा प्रवर्तित करण्यात येतील. या टूरसाठी वरच्या मजल्यासाठी 150 रुपये व खालच्या मजल्यावर प्रत्येकी 75 रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे.
मुंबईकर पार्टीसाठी घराबाहेर पडणार असल्याने त्यांच्या सेवेसाठी हॉटेल्स, रेस्तराँ सज्ज आहेत. दारूची दुकाने आज मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत तर बार व पबमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्रीला मुभा आहे.
जल्लोषानंतर देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्याची प्रथा बनली आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये उद्या मध्यरात्रीनंतर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील प्रमुख मंदिर प्रशासनांनी दर्शन रांगेची चोख व्यवस्था केली आहे.
ही खबरदारी घ्या
चौपाटीवर कुटुंबासोबत आनंद लुटताना मुले समुद्राच्या पाण्यात जाणार नाहीत, याची काळजी घ्या. मुंबईतील वाढते प्रदूषण लक्षात घेता जल्लोष करताना मर्यादित व कमी प्रदूषणकारी फटाके फोडा.
चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा गाड्या
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱयांवर मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बस मार्गांवर रात्री एकूण 25 जादा विशेष बस गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.