अश्वनी, विघ्नेश गुणवत्ता शोधमोहिमेतले हिरे

कोणाला साधं नावही माहिती नसलेले अश्वनी कुमार व विघ्नेश पुथूर यांच्यासारखे किक्रेटपटू थेट आयपीएलसारख्या दर्जेदार स्पर्धेत चमकताना दिसत आहेत. हे असं घडतं कसं असा प्रश्न नक्कीच क्रिकेटप्रेमींना पडतोय. मात्र मुंबई इंडियन्स संघातील टॅलेंट स्काऊट्सच्या शोधमोहिमेतून हे क्रिकेटचे नवे हिरे सापडले आहेत.

लागोपाठच्या दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाने सोमवारी वानखेडेच्या मैदानावर अश्वनी कुमार या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या टॅलेंट स्काऊट्सनी शेर-ए-पंजाब स्पर्धेदरम्यान अश्वनीला हेरले. अश्वनी डोमेस्टिक क्रिकेट फारसा खेळलेला नाही, मात्र तरीही मुंबई इंडियन्सने त्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवला. लिलावात त्याला 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात घेतले. अश्वनीने आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच चार विकेट टिपण्याचा पराक्रम केला. पदार्पणात चार विकेट टिपणारा तो पहिलाच हिंदुस्थानी गोलंदाज ठरला, हे विशेष.

त्याआधी, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने विघ्नेश पुथूर नावाच्या नव्या चेहऱ्याला मैदानावर उतरवलं होतं. त्या क्षणापर्यंत विघ्नेशचं नावही कुणी ऐकलं नव्हतं. चेन्नईसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध दडपण न घेता पुथूरने भेदक मारा करीत कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुड्डा अशा प्रतिभावान फलंदाजांना बाद करत आपली निवड सार्थ ठरविली. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये स्पर्धेत नीता अंबानींचा संघ आहे. विघ्नेशला तयारीचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आलं होतं. त्याचाही त्याला फायदा झाला.