
लीग क्रिकेटचा डॉन कोण हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना विचारला तर त्याचे एकच उत्तर असेल. ते म्हणजे मुंबई इंडियन्स. शनिवारी मुंबई इंडियन्सच्या महिलांनी 2023 च्या फायनलची रिमेक सादर करताना दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आपले दुसरे जेतेपद पटकावले आणि हे मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीजचे लीग क्रिकेटमधील 12 वे विक्रमी जेतेपद ठरले.
हरमनप्रीत कौरने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सच्या महिलांना डब्ल्यूपीएलचे पहिलेवहिले जेतेपद जिंकून दिले होते आणि महिला लीग क्रिकेटमध्ये नवा अध्यायाला सुरुवात केली होती. आता यात आणखी एक जेतेपदाची भर पडल्यामुळे मुंबई इंडियन्सचे गेल्या 18 वर्षांच्या लीग क्रिकेटमधील 12 व्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. 2008 साली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्सचा सुरू झालेला प्रवास आज 12 व्या ट्रॉफीपर्यंत पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सला आपले पहिले जेतेपद चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-20 पासून सुरू झाले. 2011 साली हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आपल्या जेतेपदाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच जेतेपदे पटकावली असून 2013 साली चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-20चे जेतेपद जिंकले आहे. तसेच 2023 साली मेजर क्रिकेट लीग (एमएलसी), गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय लीग टी-20 (आयएलटी-20) आणि या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या लीगमध्ये एमआय केपटाऊनने बाजी मारत जगात मुंबई इंडियन्सचा दबदबा वाढल्याचे दाखवून दिले होते.
मुंबई इंडियन्स विजेते कर्णधार
2011 – सीएलटी-20 हरभजन सिंग
2013 – आयपीएल रोहित शर्मा
2013 – सीएलटी-20 रोहित शर्मा
2015 – आयपीएल रोहित शर्मा
2017 – आयपीएल रोहित शर्मा
2019 – आयपीएल रोहित शर्मा
2020 – आयपीएल रोहित शर्मा
2023 – डब्ल्यूपीएल हरमनप्रीत कौर
2023 – मेजर क्रिकेट लीग निकोलस पूरन
2024 – आंतरराष्ट्रीय लीग निकोलस पूरन
2025 – दक्षिण आफ्रिका टी-20 राशीद खान
2025 – डब्ल्यूपीएल हरमनप्रीत कौर