मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दहिसरमध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर कारचालकाने पलायन केले. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.
दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. करण राजपूत आणि त्याचा मित्र आदित्य दोघे बाईकवरुन दहिसरहून कांदिवलीच्या दिशेने चालले होते. त्यांचा तिसरा मित्र पीयुष शुक्लाही दुसऱ्या बाईकवरुन त्यांच्यासोबतच चालला होता.
शैलेंद्र हायस्कूलजवळील पूलाखाली भरधाव कारने करणच्या बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत करण आणि आदित्य दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. दोघा जखमींना कांदिवलीतील सेवन स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. दहिसर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.