Worli Hit & Run: मिहीरला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला अडकवायचं होतं; राजेश शहांचा मास्टर प्लॅन फसला

पुण्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान अशीच हिट अँड रनची एक दुर्दैवी घटना मुंबईतील वरळी भागात घडली. रविवारी सकाळी मच्छी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा तपासात आरोपी मिहिर शाह हा सध्या फरार असून तो मिंधे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा असल्याचे समोर आले. या प्रकरणाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातातील आरोपीच्या वडिलांनीच मिहिरला  पळून जाण्यास मदत केल्याचे उघड झाले आहे.

वरळीतील एट्रिया मॉलजवळ रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला होता. त्याने या प्रकरणातून वाचण्यासाठी वडिलांना फोन करून याबाबातची माहिती दिली. तेव्हा त्याच्या वडिलांनी मिहिरला आधी ड्रायव्हिंग सीटवरून उठून शेजारच्या सीटवर बसण्यास सांगितले. जेणेकरून मिहिरवर संशय येणार नाही. नंतर मिहिरचे वडिल राजेश शहा कलानगर येथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहचले. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह आणि गाडीची नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांपर्यत जोपर्यंत काही पोहोचत नाही तोपर्यंत राजेश शहा यांनी गाडीची विल्हेवाट लावण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी ती गाडी टो करण्यासाठी टोईंग व्हॅनलाही बोलावले होते. मात्र पुरावे नष्ट करण्याआधीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने राजेश यांचा प्लॅन फसला. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधी मिहिर तेथून फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी राजेश शहा यांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत राजेश शहा यांचा प्लॅनचा पर्दा फाश झाला आहे.

आरोपी मिहिर विरोधात लूकआउट नोटीस जारी

वरळीतील अपघातानंतर मिहिरने घटनास्थळावरून पळ काढला होता. यानंतर तो काही वेळासाठी गोरेगाव परिसरातील त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला आणि पुन्हा तेथून निघाला आणि फरार झाला. दरम्यान पोलिसांना अद्यापही त्याचा शोध लागलेला नाहीय. त्यामुळे त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Worli Hit And Run : मिंधे गटाच्या उपनेत्याच्या सांगण्यावरून मिहीर फरार