
जोडीदाराला आपल्या धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे वचन देऊन नंतर रजिस्टर्ड लग्न करणे हा फसवणुकीचा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. पतीने पत्नीला धार्मिक रितीरिवाजानुसार लग्न करण्याचे वचन दिले होते. मात्र पती त्या वचनाला अनुसरून रितीरिवाजानुसार लग्न करू शकला नाही. पतीचे हे कृत्य लग्नासाठी दिलेले खोटे वचन ठरू शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
पतीने रितीरिवाजानुसार लग्न करण्याचे वचन पाळले नाही. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात बलात्काराचा तसेच फसवणुकीचा आरोप केला होता. त्याआधारे पोलिसांनी पतीविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्यासाठी पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावली झाली. रितीरिवाजानुसार लग्नासाठी पतीने दिलेले वचन आणि नंतर रजिस्टर्ड पद्धतीने केलेले लग्न याला कुठल्याही अर्थाने फसवणूक म्हणता येणार नाही, असा निर्वाळा देत खंडपीठाने पतीविरोधातील बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा रद्द केला.
पतीने माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर घरच्या लोकांना रितीरिवाजानुसार लग्न करण्याबद्दल सांगेन, असे वचन दिले होते. प्रत्यक्षात त्याने माझ्या घरच्यांना न सांगता रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही एक प्रकारची फसवणूक असल्याचे म्हणणे पत्नीने मांडले होते. तथापि, खंडपीठाने तिचा हा दावा ग्राह्य धरण्यास नकार दिला.