मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून हायकोर्टाने आज पालिकेसह प्रदूषण नियंत्रण महामंडळ व राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. मुंबईची हवा अत्यंत वाईट असून सरकारला याचे जराही गांभीर्य नाही. प्रदूषण नियंत्रणाबाबत आम्ही वारंवार आदेश देवूनही सरकार अजून झोपलेलेच आहे, अशा शब्दात न्यायमूर्तींनी प्रशासनावर ताशेरे ओढले. इतकेच नव्हे तर बांधकामे, प्रदूषण वाढवणारी वाहने आणि बेकरीच्या भट्टय़ांमधून निघणाऱया धुरातच मुंबई गुदमरली असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याबाबत खंडपीठाने चिंता व्यक्त करत मुंबईत दिल्लीसारखी परिस्थिती होऊ देऊ नका, असे ठणकावले.
मुंबईच्या प्रदूषणाप्रकरणी हायकोर्टाने स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली असून या याचिकेवर आज गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा वाढत्या वायू प्रदुषणावरुन आणि मुंबईच्या हवेचा स्थर बिघडत चालल्याने उच्च न्यायालयाने तिव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई व आसपासच्या हवेचा दर्जा ढासळल्याचे अमायकस क्युरी (न्यायालयीन मित्र) दरायुस खंबाटा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. प्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, मुंबई महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी गेल्या वर्षभरात याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केले परंतु त्यांची तंतोतंत पुर्तता झाली नसल्याचे अमायकस क्युरी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. वाढत्या प्रदूषणावर उतारा म्हणून डिझेल इंजिनच्या वाहनावर बंदी घालत मुंबईत केवळ इलेक्ट्रीक आणि सीएनजी गाडयांनाच परवानगी द्यायची का? वायू प्रदूषणाला बेकऱयांमधून निघणारा धूर देखील कारणीभूत ठरत असल्याने या भट्टय़ांवर काय कारवाई केली जाते, असे प्रश्न खंडपीठाने विचारले. त्यावर सरकारी वकिल ज्योती चव्हाण यांनी प्रदूषण पसरवणाऱया भट्टय़ांना नोटीस पाठवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे निदर्शनास येताच खंडपीठाने नाराजी व्यक्त करत सरकारला जाब विचारला तसेच याबाबत आम्ही योग्य ते आदेश देऊ असे ठणकावत याप्रकरणावरील निकाल राखून ठेवला.
एमपीसीबीतील 1310 पदे रिक्त
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील विविध 1310 पदे रिक्त असून गेल्या वर्षी हि पदे भरण्यात येणार होती मात्र केवळ 35 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली त्यावर नाराजी व्यक्त करत गेले वर्षभर तुम्ही काय केले हि पदे का नाही भरलीत असा सवाल करत महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना मुख्य न्यायमूर्तींना जाब विचारला.
1000 गाडय़ा धूर ओकतायत
मुंबईच्या ट्राफिकबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. 1000 गाडय़ा सिग्नलला उभ्या राहतात. त्यातून प्रचंड धुराचे उत्सर्जन होत असल्याचे न्यायालय म्हणाले.
न्यायालय काय म्हणाले
- बेकरीसाठी वापरल्या जाणाऱ्या भट्टय़ांसाठी लाकूड किंवा कोळसा वापरण्यासाठी कधीही परवानगी देऊ नये.
- दिवाळीच्या काळात 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याचे आम्ही आदेश दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. या आदेशानंतरही रात्री 1 वाजेपर्यंत फटाके वाजतच होते.
- प्रदूषणाची ही स्थिती अशीच राहिली तर धूर आणि धुरक्यात मुंबई कायमची हरवेल.
- प्रत्येक वेळेला आम्ही आदेश देतो परंतु त्याचे पालन होत नाही हे काय चालले आहे, यावरूनच प्रदूषणाच्या बाबतीत सरकार आणि संबंधित यंत्रणा किती गंभीर आहे हे दिसून येते.