
बेकायदा इमारत पाडण्याच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या डोंबिवलीकरांना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. कुणालाही बेकायदा इमारतीच्या कारवाईत आडकाठी आणू देणार नाही. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असे रहिवाशांना बजावत कोर्टाने बेकायदा इमारतीवरील कारवाई सुरु ठेवण्याचे निर्देश दिले.
सागाव येथील ‘राधाई कॉम्प्लेक्स’ ही सातमजली बेकायदा इमारत पाडण्याचे निर्देश कल्याण-डोंबिवली पालिकेला द्या, अशी मागणी करीत जयेश म्हात्रे यांनी याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कोर्टाच्या आदेशानुसार इमारतीवर कारवाई सुरु केली. ही कारवाई करताना राजकीय हस्तक्षेपातून 200 ते 300 जणांच्या जमावाने आडकाठी केली, असे पालिकेतर्फे अॅड. वैदेही देशमुख यांनी सांगितले.