भरपाईच्या रकमेतून विम्याचे पैसे वगळता येणार नाहीत, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

अपघाताच्या नुकसानभरपाईच्या रकमेतून विम्याचे किंवा वैद्यकीय पॉलिसीचे पैसे वगळता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्या. अतुल चांदूरकर, न्या. मिलिंद जाधव व न्या. गौरी गोडसे यांच्या पूर्णपीठाने हा निकाल दिला आहे. अपघातानंतर मिळणारे विम्याचे पैसे हा स्वतंत्र भाग आहे. त्याचा नुकसानभरपाईच्या रक्कमेशी काहीच संबंध नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. नुकसानभरपाईच्या रक्कमेतून विम्याची रक्कम वजा करावी का, असा मुद्दा पूर्णपीठासमोर सुनावणीसाठी होता. त्यावर पूर्णपीठाने हा निकाल दिला. अपघात दावा प्राधिकरणाला केवळ नुकसानभरपाई देण्याचा अधिकार आहे. या रक्कमेतून विम्याची रक्कम वजा करण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण

डॉली सतीश गांधी यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतून हा मुद्दा समोर आला. मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाने गांधी यांना नुकसानभरपाई मंजूर केली होती. मात्र विमा कंपनीने या नुकसानभरपाईतून वैद्यकीय खर्चाचे वजा करावेत. कारण गांधी यांना त्यांच्या विम्याचे पैसे मिळाले आहेत. वैद्यकीय खर्चाची रक्कम दोनदा देता येणार नाही, असा दावा कंपनीने केला होता. दरम्या विम्याची रक्कम ही स्वतंत्र प्रक्रियेतून दिली जाते. नुकसानभरपाईच्या रक्कमेशी याचा काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद गांधी यांनी केला. त्यामुळे हा मुद्दा पूर्ण पीठाकडे सुनावणीसाठी पाठवण्यात आला होता.