
बृहन्मुंबई महापालिकेच्या 30 प्रसूतिगृहांचे सोशल ऑडिट होणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाने आठ सदस्यीय समिती स्थापन केली. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ही समिती स्थापन केली. यामध्ये जे. जे. व नायर रुग्णालयाचे दोन सदस्य आहेत. त्यांची नावे पालिकेनेच सुचवली आहेत. उर्वरित सहा सदस्यांची नावे याचिकाकर्ते खुरुसुद्दीन अन्सारी यांनी दिली आहेत. पालिकेच्या प्रसूतिगृहात सुविधांचा अभाव असतो, असा दावा अन्सारी यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने ही समिती स्थापन केली. प्रसूतिगृहांचे सोशल ऑडिट केल्यानंतर त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश खंडपीठाने समितीला दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी आठ आठवडय़ांनी होणार आहे.