गर्भपाताच्या वेदना प्रेयसीनेच का सहन कराव्यात? प्रियकरावरही याची काही ना काही जबाबदारी निश्चित करायला हवी, असे निरीक्षण नोंदवत याबाबत ठोस उपाययोजना करणार असल्याचे सोमवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. गर्भपाताच्या प्रक्रियेत प्रियकराचा सहभाग राहील, त्याच्यावर जबाबदारी असेल यासाठी निश्चितच काहीतरी ठरवले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणात योग्य ती माहिती सादर करण्यासाठी आम्ही अॅमक्यस क्युरी म्हणून अॅड. अभिनव चंद्रचूड यांची नियुक्ती करत आहोत. जेणेकरून प्रियकराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आम्हाला मदत होईल, असेही न्यायालयाने नमूद केले.
ती एकटीच असते
अनावश्यक गर्भधारणेमुळे मुलगी ढासळलेली असते. ती एकटीच सर्व सहन करत असते. तिच्यासोबत ना तिचे पालक असतात ना प्रियकर असतो. 24 आठवडय़ांनंतर गर्भपातासाठी तिला न्यायालयाचे दार ठोठवावे लागते. वैद्यकीय चाचणीला तिला एकटीलाच सामोरे जावे लागते. गर्भपात किंवा बाळाला जन्म देणे हा एवढाच पर्याय तिच्यासमोर असतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
राज्य शासनाने मदतीचा हात द्यावा
गर्भपातासाठी येणाऱया मुलीला, महिलेला राज्य शासनाकडून योग्य तो मदतीचा हात मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक़्त करतो, असेही न्यायालयाने नमूद केले.