पुणे येथे एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. यात दोन अल्पवयीन मुले होती. या हत्येच्या गुह्यातील आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली. ही फाशी कायम करावी यासाठी राज्य शासनाने केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
भागवत काळे असे या आरोपीचे नाव आहे. पुणे सत्र न्यायालयाने 14 डिसेंबर 2001 रोजी त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात त्याने अपील याचिका केली होती. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र याचिका केली होती. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. काळेची फाशी कायम करावी असा कोणताच मुद्दा नाही, असे नमूद करत खंडपीठाने पुणे सत्र न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला. काळेची निर्दोष सुटका केली जात आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही
परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी काळेवर हत्येचा ठपका ठेवला. या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. सरकारी पक्ष काळेचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. संशयाचा फायदा देत काळेची निर्दोष सुटका केली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
शिक्षेचा तपशील
या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने भागवत काळे, नवनाथ काळेला फाशीची, तर भागवतची पत्नी गीताबाईला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सुरुवातीला नवनाथ काळेची फाशी रद्द करत उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर गीताबाईच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. स्वतंत्र सुनावणी घेत खंडपीठाने भागवत काळेची निर्दोष सुटका केली.
काय आहे घटना
पुण्यातील कल्याणी नगर येथील सोसायटीत 1997 मध्ये ही धक्कादायक घटना घडली. रमेश पाटील (50) व 12 वर्षीय मुलीचा मृतदेह ड्रेनेजमध्ये सापडला. पत्नी(40) व 7 वर्षीचा मुलाचा मृतदेह घरात होता. घरातून लाखो रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने गायब होते. रक्ताच्या थारोळ्यात हे मृतदेह होते. इमारतीत वॉचमनचे काम करणारा भागवत, त्याची पत्नी गीताबाई व नवनाथ घटनेच्या दिवसापासून बेपत्ता होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. 20 मे 1997 रोजी भागवतला अटक झाली तर गीताबाई व नवनाथला 27 मे 1997 रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणी सरकारी पक्षाने 37 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. चोरीच्या हेतूने या निर्घृण हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप होता.