
होळी सणापूर्वीच मुंबई शहर व उपनगरांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. तापमानात अचानक मोठी वाढ झाली असून पारा 37 अंशांच्या विक्रमी पातळीवर गेल्याने मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मागील आठवडाभर रात्री वातावरणात गारवा होता. तो गारवादेखील गायब झाला आहे. येत्या दिवसांत रखरखाट आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरात गुरुवारी पाच वर्षांतील फेब्रुवारीतील विक्रमी तापमानाची नोंद झाली. यापूर्वी 2021 मध्ये 36.3 अंश तापमान नोंद झाले होते.
सांताक्रुझमध्ये गुरुवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी वाढले आणि ते 36.3 अंशांवर गेले. किमान तापमान दोन अंशांची वाढ होऊन पारा 20 अंशांवर गेले.फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर हवेतील गारवा कमी झाला आहे. केवळ रात्री गारवा होता. बुधवारी रात्रीदेखील उकाड्यात वाढ झाली आणि किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक नोंद झाले. नंतर दिवसभर मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके सोसत कामाची धावपळ करावी लागली.
मुंबईत कोकण विभागातील सर्वाधिक तापमान नोंद झाले. महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाही राहणाऱया उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या मार्गात प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा अडसर निर्माण झाला आहे. थंड वाऱ्यांची वाट रोखली गेल्याने मुंबईत उन्हाची दाहकता वाढली आहे, असे हवामान खात्यातील तज्ञांनी म्हटले आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील संपूर्ण आठवडाभर कमाल तापमान 36 अंशांच्या आसपास राहील, तर सकाळी पारा 20 अंशांच्या वर राहील.
राज्यभर होरपळ
मुंबईसह संपूर्ण राज्यभर तापमानाने कमाल पातळी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तर अक्षरशः होरपळ सुरू झाली आहे. गुरुवारी सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान नोंद झाले. त्याचबरोबर मराठवाडय़ातही तापमान 36 अंशांच्या पुढे गेले आहे. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आदी भागांत उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. कोकणातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.