मुंबईकरांना हुडहुडी… पारा 19 अंश, थंडीचा कडाका वाढला; तापमान घसरणीला, प्रदूषण गंभीर पातळीवर

मुंबईत थंडीचा कडाका वाढला असून रविवारी किमान तापमानात मोठी घट झाली. सांताक्रुझमध्ये सकाळी 19 अंश इतके किमान तापमान नोंद झाले, तर कुलाब्यात किमान आणि कमाल अशा दोन्ही स्तरांवर तापमानात घट झाली. त्यामुळे मुंबईकरांनी सुट्टीच्या दिवशी अगदी दुपारपर्यंत थंडीचा सुखद अनुभव घेतला. येत्या आठवडय़ात पारा 17 अंशांपर्यंत खाली जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यंदा नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा उलटून गेला तरी मुंबईत थंडीचा पत्ता नव्हता. पूर्वेकडील वारे सक्रिय राहिल्याने शहरातील थंडीची वाट अडली होती. मात्र दोन दिवसांपासून थंडी मुंबईकरांच्या कुशीत शिरली आहे. रविवारी मुंबईकरांच्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी थंडी आणखी सक्रिय झाली आणि नागरिकांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतला. शहर परिसरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रात्री व सकाळच्या तापमानात मोठी घट झाली. आरे कॉलनीच्या लगत असलेल्या पवई, भांडुप, जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली परिसरातील नागरिक थंडीच्या तीव्रतेने चांगलेच कुडकुडले. पुढील तीन-चार दिवसांत तापमानात अशीच घट होईल आणि पारा 17 ते 18 अंशांपर्यंत खाली जाईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

स्वेटर खरेदीसाठी मार्पेटमध्ये गर्दी

थंडीची तीव्रता वाढू लागल्यानंतर मुंबईकर स्वेटर खरेदीसाठी मार्पेट गाठू लागले आहेत. परळ, लालबाग परिसरात स्वेटर विक्रीसाठी अनेक विव्रेते दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे स्वेटर खरेदीसाठी रविवारी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.

मुंबईत थंडीची तीव्रता वाढली असतानाच हवेचा दर्जा खालावला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक खराब पातळीवर आहे. दोन दिवस हवेचा दर्जा काहीसा सुधारला होता. मात्र रविवारी प्रदूषणात वाढ झाली व हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने 201 अंकांची पातळी गाठली. त्यामुळे खोकला, सर्दी, तापाचे रुग्ण वाढले आहेत.

जागोजागी सुरू असलेल्या इमारत बांधकाम प्रकल्पांतून बाहेर पडणारे धुळीचे साम्राज्य रोखण्यास प्रशासन तोकडे पडले आहे. प्रदूषणकारी उद्योगांवर कठोर कारवाई करण्याकामी यंत्रणा ढिम्म आहे. त्याचा परिणाम होऊन मुंबईच्या हवेची गुणवत्ता पूर्णपणे बिघडली आहे. रविवारी सकाळी 6 वाजता हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने 201 अंकांची घातक पातळी गाठली होती. हा निर्देशांक मानवी आरोग्यावर परिणामकारक असल्याच्या प्रवर्गात मोडतो. नंतर संपूर्ण दिवसभर हवेचा गुणवत्ता निर्देशांक 101 ते 200 अंकांपर्यंतच्या खराब पातळीवरच राहिला. त्यामुळे अनेक मुंबईकरांना खोकला, सर्दी, तापाने हैराण केले आहे. दमा तसेच इतर श्वसनविकार असलेल्या लोकांना शहरातील वाढलेल्या प्रदूषणाचा अधिक त्रास होत आहे.