मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण येथे दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात राजापूर येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री 8.30च्या सुमारास घडली. सचिन एकनाथ लाड (रा. हसोळ राजापूर ,वय 35) हा युवक जागीच ठार झाला. तसेच सोबत असलेला तानाजी वामन शेळकर (वय 30,रा. कोडवशी राजापूर शिखरवाडी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, सचिन लाड व तानाजी शेळकर हे हिरो होंडा कंपनीच्या मोटारसायकलने खारेपाटण मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरून जात होते. त्यावेळी मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर वाहन यांची समोरासमोर धडक होऊन मोटार सायकलस्वार सचिन लाड जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला तानाजी शेळकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खारेपाटण प्राथमिक. आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस माने व मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले. तर कणकवली उपपोलीस निरीक्षक राजकुमार मुंडे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद देसाई यांनी खारेपाटण येथे अपघात स्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास खारेपाटण पोलीस करत आहेत.