मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची डेडलाइन पुन्हा हुकली आहे. मिंधे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते. मात्र नवीन वर्ष सुरू होऊनही पनवेल ते महाडदरम्यान महामार्गाचे काम अपूर्णच असून ठिकाठिकाणी बायपास, उड्डाणपूल तसेच मोऱ्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे खोके सरकारने थापेबाजीची हॅटट्रिकच मारली आहे. या ढिसाळ कारभारामुळे पंधरा वर्षांनंतरही कोकणवासीयांना खडतर प्रवास करतच गाव गाठावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे. औद्योगिक वसाहती, व्यापारी बंदरे आणि पर्यटनस्थळांना जोडणारा हा मार्ग असल्याने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. २०११ साली पळस्पे ते इंदापूरपर्यंतच्या कामाची सुरुवात झाली होती, तर इंदापूर ते झाराप हे काम 2014 नंतर मंजूर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात चौपदरीकरण आणि डांबरीकरण तर दुसऱ्या टप्प्यात चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचा समावेश होता. आता रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे 12 टप्प्यात काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे महामार्गाचे काम रडतखडत सुरू आहे. मिंधे सरकारमधील रवींद्र चव्हाण यांनी दोन वर्षांत काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांची 31 डिसेंबरची डेडलाइनदेखील हुकली आहे.
महामार्ग कामाची सध्याची स्थिती
पळस्पे ते कासू दरम्यानच्या गोव्याकडील एका मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, तर कासू ते इंदापूर मार्गिकेच्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. महामार्गावरील सर्वात खराब रस्ता याच टप्प्यात आहे. इंदापूर ते वडपाले 25 किलोमीटरपैकी सुमारे 15 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. वडपाले ते भोगाव आणि भोगाव ते कशेडी मार्गातील एका मारिकिचे काम झाले आहे. कशेडी ते परशुराम घाट टप्प्यातील परशुराम घाटातील काम शिल्लक आहे. आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड टप्प्यातील काम रखडले आहे, तर वाकेड ते झाराप दरम्यानची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान नागोठणे, रातवड, इंदापूर, माणगाव, काळ नदी, गोद नदी आणि लोणेरे येथील पुलांची बांधकामे दोन वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सुमारे25 अरुंद मोऱ्यांची बांधकामे सुरूच झालेली नाहीत.