मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी छातीठोकपणे सांगितले होते. आता एक वर्षानंतर पुन्हा त्यांनी नवी डेडलाईन दिली आहे. मुंबई-गोवा हायवे पूर्ण व्हायला आणखी अडीच वर्षे लागणार, असे त्यांनी म्हटले आहे. महामार्गावर असलेले 14 पूल आणि त्यांचे जोडरस्ते यांचे काम अद्यापही व्हायचे आहे. या कामासाठी 2 ते अडीच वर्षे लागतील. त्यानंतरच या रस्त्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गाच्या 10 भागांचे काम विविध ठेकेदारांना देण्यात आले. मागील 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू आहे. प्रलंबित असलेल्या 14 पुलांचे काम राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेकडून केले जात आहे. यातील 6 ठेकेदारांनी चांगले काम केले; मात्र काही ठेकेदार सोडून गेले. काही ठेकेदारांनी उपठेकेदार नेमले. काही ठिकाणी जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न आहे. काही ठिकाणी ठेकेदारांनी काम सोडल्यामुळे अधिकोषांनी आर्थिक साहाय्य बंद केले आहे. असे असले तरी गणेशोत्सवाला कोकणात जाणारा मार्ग चांगला करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.’’