मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यात चिखलाची मलमपट्टी; खोके सरकार अजून कोकणवासीयांचा किती अंत पाहणार?

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम म्हणजे कंत्राटदारांना पोसण्यासाठी कुरणच झाले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. डांबरी रस्ता उखडल्यानंतर पनवेलपासून महाडपर्यंत नव्याने केलेला काँक्रीट रस्ता काही महिन्यांतच अनेक ठिकाणी फाटला असून दणकेबाज प्रवास करताना चाकरमान्यांची हाडे अक्षरशः खिळखिळी झाली आहेत. धक्कादायक म्हणजे हे पाप झाकण्यासाठी सरकारने दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे. मात्र कंत्राटदाराने चक्क साईडपट्ट्यांवरील जमा झालेला चिखल गोळा करून खड्डेभरणी सुरू केली आहे. मात्र धो-धो पावसात ही मलमपट्टी काही क्षणात धुऊन जात असल्याने ‘पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ अशी अवस्था या मार्गाची झाली आहे.

दुरुस्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीची लूटच सुरू असल्याचा आरोप होत असून या वाट्यात नेमका कुणाचा हात आहे, असा सवाल प्रवासी करीत आहेत. रस्त्याच्या या भयंकर अवस्थेमुळे मेटाकुटीला आलेल्या चाकरमान्यांनी खोके सरकार अजून आमचा किती अंत पाहणार आहे, असा संताप व्यक्त केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची रायगड जिल्ह्यात अक्षरशः चाळण झाली आहे. पनवेल ते पोलादपूर या 157 किलोमीटर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाच्या दुर्दशेमुळे सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे दुरुस्तीचे काम करणारे ठेकेदार मात्र सर्वांच्या डोळ्यांत धुळफेक करीत आहे. खड्डे भरण्यासाठी महामार्गाच्या कडेला पडलेला खडीमिश्रित चिखल वापरला जात आहे. या मलमपट्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाकरमानी आणि वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. महामार्ग पूर्णपणे खड्यात गेल्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने ताशी 23 ते 30 किलोमीटर वेगाने चालवावी लागत आहेत.

गणपती उत्सवात होणार हाल

गणपती उत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कोकणात घराघरात गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येते. या उत्सवासाठी चाकरमानी आपापल्या गावी जातात. चाकरमानी गावी जाण्यासाठी मोठ्या संख्येने खासगी वाहनांचा वापर करतात. यामुळे उत्सवादरम्यान महामार्गावरील वर्दळीत चौपटीने वाढ होते. महामार्गावर सर्वत्र खड्डे पडल्याने नेहमीच वाहतूककोंडी होते. यामध्ये उत्सवादरम्यान वर्दळ वाढल्यास वाहतूककोंडीत वाढ होऊन चाकरमान्यांना आपापल्या गावी पोहोचण्यास उशीर होईल, असे अमित चवरकर या चालकाने सांगितले.

  • पनवेल ते कासूदरम्यान सेवा रस्ते व गडब येथील भुयारी मार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. कासू ते इंदापूरदरम्यान 72 टक्के काम पूर्ण झाल्याचे सरकार सांगत आहे. मात्र भुयारी मार्ग, उड्डाणपुलांचे काम अनेक ठिकाणी लटकले आहे.
  • मार्गावरील काही खड्डे तर एक फुटापेक्षा जास्त खोल आहेत, तसेच महामार्गावर ठिकठिकाणी साईटपट्टीची दुरवस्था झाली आहे. रात्री याचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात वाढले आहेत.
  • पनवेल-पोलादपूरदरम्यान मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे पनवेलहून पोलादपूरला पोहोचण्यासाठी पाच तासांहून अधिक वेळ लागत आहे. वास्तविक हे अंतर तीन तासांत पार होणे गरजेचे आहे.