खोके सरकारने गंडवल्याने गणपतीला गावाला निघालेल्या चाकरमान्यांना यंदाही प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. चिखल आणि खड्डय़ांच्या बजबजपुरीत हरवलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना आधीच हाडे खिळखिळी होत असताना नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे आज माणगाव, लोणेरे, तळेगाव येथे चाकरमानी चार तास ट्रफिक काsंडीत अडपून पडले. त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक इंचभरही पुढे सरकत नसल्याने तासन्तास वाहतूककोंडीत अडकलेल्या गणेशभक्तांच्या संतापाचा स्फोट झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून ‘गणा धाव रे…’ असे गाऱहाणे घालून बाल्या डान्स करत सरकारचा निषेध केला.
गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण चौपदरीकरण करून मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर त्यांनी निदान एक मार्गिका तरी पूर्ण करून देतो, पण आंदोलने करू नका अशी गयावया केली, परंतु त्यांचे आश्वासन हे अळवावरचे पाणीच ठरले. गेल्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गाची जी अवस्था होती तीच याही वर्षी कायम आहे. त्यामुळे यंदा रवींद्र चव्हाणांच्या ऐवजी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाच्या पाहणीचा दौरा केला. त्यामुळे गणेशोत्सवात गावाला जाताना मोठा दिलासा मिळेल अशी आशा चाकरमान्यांना वाटत होती, परंतु ती सपशेल फोल ठरली. शिंदेंचा दौराही केवळ फार्सच ठरला.
हे चित्र जरा मुख्यमंत्र्यांना पाठवा
रायगड पोलीस आणि अन्य कर्मचारी मिळून तब्बल चारशे जणांचा फौजफाटा महामार्गावर उतरवण्यात आला होता, परंतु वाहतूककाsंडी सुटत नव्हती. त्यामुळे लोणेरे, तळेगाव दरम्यान कार, एसटीमध्ये बसलेले चाकरमानी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब केली. ‘गणा धाव रे… मला पाव रे…’ अशी आळवणी करत त्यांनी चक्क रस्त्यावरच बाल्या डान्स केला. याचे वार्तांकन करणाऱया प्रसारमाध्यम प्रतिनिधींजवळ ‘‘हे चित्र जरा मुख्यमंत्र्यांनाही पाठवा’’ असा संताप व्यक्त केला.
खड्डय़ांचे विघ्न कायम
निवडणुका समोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी केलेला मुंबई–गोवा महामार्गाचा दौरा चाकरमान्यांना दिलासा देणारा होता. मात्र सुसाट प्रवासाचे गाजर दाखवणाऱया मिंधे सरकारचा डाव बुधवारी प्रवास सुरू केल्यावरच उघड पडला आहे. हाडे खिळखिळी करणाऱया खड्डय़ांतून वाट काढत सरकारच्या नावाने खडे पह्डत चाकरमानी आपल्या गावी आज पोहचत आहेत. सोनवी चौकातून देवरुखला जाणारा हा मुख्य रस्ता. भुईबावडा, मांगवली व उंबर्डे ते वैभववाडी, अनेक ठिकाणी पुलांची रखडलेली कामे याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी बोगदा ते आरवलीपर्यंतची दोन्ही लेन सुरू आहेत. आरवलीपासून संगमेश्वरपर्यंत जवळपास एक लेन पूर्ण झाली आहे. सावर्डे, वहाळ फाटा, आरवली येथील जोडरस्ते, संगमेश्वरपर्यंत काही ठिकाणी तात्पुरती पेव्हर ब्लॉकने भरली असली तरी महामार्गावर संगमेश्वरपासून उक्षीपर्यंत एक लेनचे काम अपूर्ण आहे.
कशेडी दुसऱया मार्गिकेचे काम अद्याप अपूर्णच
कशेडी घाटाला पर्याय असणाऱया बोगद्याच्या दुसऱया मार्गिकेतून 3 सप्टेंबरपूर्वी वाहतूक सुरू करण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास संबंधित ठेकेदारांनी नेहमीप्रमाणे खोटा ठरवला असून अद्याप दुसऱया मार्गिकेचे काम पूर्ण झालेले नाही. कशेडी घाटातदेखील पोलादपूर बाजूला काम सुरू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने एका बोगद्यातून सर्व प्रकारची वाहने धोकादायक परिस्थितीत ये-जा करत आहेत. 5 सप्टेंबर उजाडला तरी काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गावरील खड्डय़ांमुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणाच प्रवास करावा लागत आहे. महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत सोडून पळ काढणाऱया ठेकेदार पंपनीवर माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. तरीही ठेकेदाराकडून याचे गांभीर्य घेण्यात आलेले दिसून येत नाही.
अवजड वाहनेही घुसली
नागोठणे, सुकेळी खिंड, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे आणि टेमपाले येथील रस्त्यांना पडलेली भगदाडे ठेकेदाराने बुजवलीच नाहीत. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचा मोठा राडारोडा निर्माण झाला आहे. 4 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर या महामार्गावर अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहील असे आदेश राज्य सरकारने दिले होते, परंतु सरकारचे आदेश धुडकावून असंख्य अवजड वाहने मुंबई-गोवा महामार्गावर घुसल्याने कोंडी झाली.
जीव घुसमटला… खाण्यापिण्याचे हाल
महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या मधोमध सुरू केलेले फ्लायओव्हरचे काम अर्धवट सोडून दिल्याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला. अरुंद रस्त्यांमुळे लोणेरे, तळेगाव, माणगाव येथे तुफान ट्रफिक कोंडी झाली. 8 ते 10 किलोमीटरच्या रांगा लागल्या. चार तास या वाहतूककाsंडीत अडकल्याने प्रवाशांचा जीव मेटापुटीला आला, खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल झाले.