मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं

मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री 8.15 वाजताच्या सुमारास झाला. यात दहा वर्षाच्या मुलासह त्‍याची आई गंभीर जखमी झाली आहे. या अपघातानंतर कणकवलीकरांनी गडनदी पुलावर मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावर ट्रक गोव्याच्या दिशेने जात होता. तर दुचाकीवरील आई आणि मुलगा हे हळवल येथे जाणार होते. हळवल फाटा येथे ट्रकने दुचाकीला धडक देत पंचवीस ते तीस फुट फरफटत नेले. त्‍यानंतर ट्रक थांबवून ट्रकचालक पसार झाला. यादरम्‍यान ज्‍येष्‍ठ पत्रकार आबा खवणेकर आणि त्‍यांचे सहकारी कुडाळच्या दिशेने जात होते. त्यांनी अपघामधील जखमी महिलेला आणि तिच्या मुलाला आपल्‍या कारमधून शहरातील खासगी रूग्‍णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. महामार्गावरील गडनदी पुलालगतच्या हळवल फाटा येथे सातत्‍याने अपघात होत आहेत. मात्र महामार्ग प्राधिकरण त्‍यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्‍याच्या निषेधार्थ कणकवलीकरांनी एकत्र येऊन रास्ता रोको सुरू केला आहे. यात महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्‍या आहेत. या अपघातानंतर सर्व सामान्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.