Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मुंबईची पहिली भुयारी मेट्रो 3 सुरू करण्यात आली. या मेट्रोसाठी रातोरात आरेतील हजारो झाडं तोडली गेली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो- 3 मार्गातील आरे ते बीकेसी या 12.44 किमी लांबीच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन करण्यात आले होते. पण या भुयारी मेट्रोचा फज्जा उडाला आहे. आरे ते बीकेसी मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

हा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुला होऊन साडेचार महिने झाले आहेत. पण प्रवाशांचा अपेक्षित तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2024 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान आरे – बीकेसी मार्गावरील मेट्रोने फक्त 26,60,000 प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजेच दररोज सरासरी 20,000 पेक्षाही कमी प्रवाशांनी यातून प्रवास केला आहे.

मेट्रो- 3 मार्गातील आरे ते बीकेसी लाईनचे उद्घाटन 5 ऑक्टोबर 2024 रोजी झाले होते. याच्या दोन दिवसानंतर ही मार्गिका नागरिकांसाठी खुली करण्यात आली. या मार्गिकेचे बांधकाम आणि संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) सुरुवातीला आरे ते बीकेसी मेट्रोने दररोज 4,00,000 प्रवाशी प्रवास करतील, असा अंदाज वर्तवला होता.

एका फेरीत सरासरी किती पॅसेंजर?

याबाबत एमएमआरसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, 12.44 किमी लांबीच्या या मार्गावर 136 दिवसांत 29,162 मेट्रो फेऱ्या झाल्या आहेत. एका फेरीत आरे ते बीकेसी आणि परतीचा संपूर्ण प्रवास असतो. आकडेवारीनुसार, आरे ते बीकेसी आणि परतीच्या प्रवासात 91 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर याच्या एकेरी फेरीत (One-Way Journey) म्हणजेच आरे ते बीकेसी प्रत्येकवेळी फक्त सरासरी 46 प्रवाशांनी प्रवास केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

प्रत्येक आठ डब्यांच्या मेट्रो ट्रेनमध्ये जास्तीत जास्त 2,500 प्रवासी क्षमता असते. प्रत्येक 7 मिनिटे 30 सेकंदांच्या अंतराने धावणाऱ्या नऊ मेट्रो असूनही याची प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. मेट्रो आठवड्याचे सहा दिवस सकाळी 6:30 ते रात्री 10:30 आणि रविवारी सकाळी 8:30 ते रात्री 10:30 पर्यंत धावते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांची संख्या जास्त असते, तर दिवसभर प्रवाशांची संख्या कमी खूपच कमी असते, अशी माहिती एमएमआरसीने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.