मुंबईतील चेंबूर भागात गुरुवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. चेंबूर कॅम्प परिसरातील एका दुकानाच्या जवळ गा स्फोट झाला असून यात 9 जण होरपळले आहे. सर्व जखमींना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिली.
गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास चेंबूर कॅम्प परिसरातील एका दुकानाला आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. या आगीत इलेक्ट्रिक वायर, फर्निचर जळून खाक झाले असून 9 जण जखमी झाले.
ओम लिंबाजिया (वय – 9), अजय लिंबाजिया (वय – 33), पूनम लिंबाजिया (वय – 35), मेहक लिंबाजिया (वय – 11), ज्योत्स्ना लिंबाजिया (वय – 53) पियूष लिंबाजिया (वय – 25), नितीन लिंबाजिया (वय – 55), प्रीती लिंबाजिया (वय – 34) आणि सुदाम सिरसाठ (वय – 55) अशी जखमींची नावे आहेत.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या दुकानाचे छत खाली पडले आहे.