नेव्हीची बोट कोण चालवत होते? स्टंटबाजीने केला घात! ‘नीलकमल’दुर्घटनेतील मृतांची संख्या 14

गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाच्या दिशेने जात असताना नीलकमल या बोटीला झालेल्या भीषण अपघातात बुडालेले हंसराज भाटी (43) आणि जोहान निसार अन्सारी (7) हे दोघे प्रवासी बेपत्ता होते. आज हंसराज यांचा मृतदेह आढळला असून मृतांची संख्या 14 झाली आहे. दरम्यान, नौदलाची स्पीड बोट नेमकी कोण चालवत होते याचा तपास सुरू असून स्टंटबाजीनेच घात केल्याची चर्चा आहे.

गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा येथे निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला उरणच्या करंजा येथे नौदलाची स्पीड बोट धडकल्याने हा अपघात झाला होता. नौदलाच्या त्या स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी घेत असताना ही दुर्घटना घडली. परंतु ज्या पद्धतीने ही स्पीड बोट नीलकमल बोटीला धडकली ते पाहता सेलरची स्टंटबाजी नडली की इंजिनात खरंच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सेलरचा ताबा सुटून ही दुर्घटना घडली ते अद्याप अनुत्तरीत आहे. नौदलाच्या स्पीड बोटीवर नौदलाचे दोघे तर इंजिन कंपनीचे चौघे जण होते. त्यांच्या पैकी नेमकं स्पीड बोट कोण चालवत होता ते देखील कळू शकलेले नाही. मात्र अपघातात या सहापैकी चौघांचा बुडून मृत्यू झाला तर दोघे बचावले. त्यात एक नौदलाचा तर दुसरी पंपनीची व्यक्ती आहे. नौदल माकाxस करमवीर यादव (30) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करमवीर हेच ती स्पीड बोट चालवत होते असे समजते, मात्र याबाबत नौदलाकडून अधिकृतपणे सांगण्यात आले नाही.

याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे नौदलाच्या वतीने सांगण्यात येते. दरम्यान, नौदलाचे सेलर नेहमीच त्यांच्या बोटी बेदरकारपणे चालवत असतात अशी तक्रार प्रवासी बोटीवाल्यांकडून करण्यात आली.

कुलाबा पोलिसांत गुन्हा दाखल

नीलकमल प्रवासी बोट दुर्घटनेप्रकरणी नौदलाची स्पीड बोट चालविणारा तसेच अन्य जबाबदार व्यक्तींविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकिनाका येथे राहणारे नेताराम चौधरी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. नेताराम हे देखील त्या दुर्घटनेतून बालबाल बचावले.

बेपत्ता हंसराज भाटी यांचाही मृतदेह सापडला

मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले हंसराज भाटी हे त्यांची पत्नी संतोष, मुलगा तरुण (14) व हंसराजच्या मेहुणीचा मुलगा व त्याची पत्नी असे पाचजण नीलकमल बोटीने एलिफंटाला निघाले होते. पण दुर्दैवाने ते प्रवास करत होते त्या नीलकमल बोटीचा करंजा येथे अपघात झाला. या अपघातातून हंसराज भाटी यांची पत्नी, मुलगा आणि दुसरे दाम्पत्य सुखरुप बचावले. परंतु हंसराज भाटी हे बेपत्ता होते.

आज दुसऱया दिवशी देखील अपघतानंतर बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरू होता. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करणारे हंसराज भाटी हे मालाड येथे राहत होते. हंसराज यांना पोहता येत होते. अपघातानंतर त्यांच्याजवळ लाईफ जॅकेट असल्याचे पाहिले होते, पण नंतर काय झाले ते कळलेच नाही, असे हंसराज यांच्या मुलाचे म्हणणे असल्याचे त्यांचे मामे भाऊ सुरेश यांनी सांगितले. अखेर आज संध्याकाळी हंसराज यांचाही मृतदेह सापडला. दरम्यान जोहान पठाण (7) या मुलाचा अजून शोध लागलेला नाही.

अपघातग्रस्त बोटीखाली सापडला मृतदेह

आज दुसऱया दिवशी देखील बेपत्ता दोघांचा कसून शोध सुरू होता. अपघातग्रस्त नीलकमल बोट ही टोव्ह करून शिवडी येथे आणत असताना भाऊच्या धक्क्यापासून काही अंतरावर असताना बोटीच्या खालच्या बाजूला हंसराज यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत मिळून आला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 इतकी झाली आहे. अजून एका मुलाचा थांगपत्ता लागला नसून नौदलाचे माकाxस करमवीर यादव हे आयएनएस अश्विनी या इस्पितळात आयसीयूमध्ये दाखल आहेत.

अपघातानंतर बोटीवरील लाईफ जॅकेट प्रवाशांना पुरविण्यात आले नाही, तसेच खलाशांकडून कुठल्याही सूचना देण्यात आल्या नाही. हे चुकीचे असून निव्वळ हलगर्जीपणा असल्याची तक्रार अपघातातून बचावलेल्या प्रवाशांची आहे.

आरिफ आदमी बामणे देवदूत ठरला

भरसमुद्रात अपघात झाल्यानंतर बोटीवरील प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू झाला. नेमकं काय करायचं हेच कोणाला समजत नव्हते. बोटीवरील खलाशांकडून कोणतीच सूचना दिली जात नव्हती. त्यामुळे प्रत्येकांचा बचावासाठी आकांत सुरू होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चॅनेल पायलट म्हणून समुद्रात काम करणारा आरिफ आदम बामणे हा पुढे सरसावला. आरिफने क्षणाचाही विलंब न लावता झटपट मदतकार्य सुरू केले. त्याने जवळपास 25 जणांना मदतीचा हात देत त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. देवदुताच्या रुपात आरिफ घटनास्थळी आल्याने 25 जणांचे प्राण वाचले. अपघाताचे ते दृश्य अंगावर काटा आणणारे होते. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धडपड बघून काळजाचा थरकाप उडाला होता. पण मन घट्ट करत मी मदत केली. सुदैवाने वेळीच मदतीचा हात देता आल्याने मोठा अनर्थ टळला. याचे समाधान असल्याचे आरिफ यांनी सांगितले. याआधी असा अपघात केव्हा पाहिला नव्हता. अत्यंत हृदयद्रावक तो आकांत होता असेही आरिफ म्हणाले.

दुर्घटनेचा धसका… प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट दिले

नीलकमल दुर्घटनेचा चांगलाच धसका बोटमालकांनी घेतला आहे. आज गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरी बेटावर रवाना झालेल्या सर्वच बोटींतील प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट देण्यात आले. दरम्यान दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोट किनाऱयावर आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती गेट वे – एलिफंटा जलवाहतूक संस्थेचे इक्बाल मुकादम यांनी दिली.

अपघातानंतर बोटीवरील लाईफ जॅकेट प्रवाशांना पुरविण्यात आले नाही, तसेच खलाशांकडून कुठल्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. हे चुकीचे असून निव्वळ हलगर्जीपणा असल्याची तक्रार अपघातातून बचावलेल्या प्रवाशांची आहे.