
महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत एकाच वेळी तब्बल 2121 रस्त्यांपैकी 1084 रस्त्यांची कामे सुरू असल्याने मुंबईत धूळ प्रदूषण वाढले आहे. शिवाय कामाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे रस्ते बंद केल्यामुळे मुंबईत धुळीचे प्रदूषण वाढत असून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. ही कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे. यातच अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे तब्बल 3.37 कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे पावसाळ्याला अवघे दोन ते अडीच महिने राहिल्याने ही सर्व कामे कधी पूर्ण होणार, असा सवाल मुंबईकरांमधून उपस्थित केला जात आहे.
पालिकेने सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. यानुसार पालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात फेज-1 मध्ये 700 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत तर फेज-2 मध्ये 1421 कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे करताना बहुतांशी ठिकाणी रस्त्याची कामे करण्यासाठी एका बाजूचा मार्ग बंद करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यातील बरेच ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याचे काम समोर आले आहे, तर दिवसरात्री काम सुरू असल्यामुळे रहिवाशांना मशिन्सच्या आवाजामुळे नाहक मनस्ताप होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.
असे झाले आतापर्यंत काम
फेज – 1
एकूण रस्ते 700 किमी
रस्त्यांची एकूण लांबी 322 किमी
काम पूर्ण झालेले रस्ते 252
काम पूर्ण झाले (किमीमध्ये) 68 किमी
काम सुरू असलेले रस्ते 310
काम सुरू रस्ते (किमीमध्ये) 197 किमी
फेज – 2
रस्त्यांची एकूण संख्या 1421
एकूण पूर्ण काम किमीमध्ये 381 किमी
काम पूर्ण झालेले रस्ते 20
काम सुरू असलेले रस्ते 774
काम सुरू असलेले रस्ते (किमीमध्ये) 223 किमी