
43 व्या रणजी जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून जामठावर उतरलेल्या गतविजेत्या मुंबईला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी 323 धावांचे जबर आव्हान गाठावे लागणार आहे. त्याआधी यश राठोडच्या 151 धावांच्या संयमी खेळीने विदर्भची आघाडी 405 धावांवर नेत रणजी करंडकाच्या अंतिम फेरी प्रवेशावर आपला दावा मजबूत केला. चौथ्या दिवसअखेर 3 बाद 83 अशी अडखळत सुरुवात झाल्यामुळे मुंबईला पाचव्या दिवशी 323 धावांसाठी जोरदार संघर्ष करावा लागणार आहे.
रणजी करंडकाच्या उपांत्य लढतीत चौथ्या दिवशीही विदर्भनेच आपले वर्चस्व राखत अंतिम फेरी प्रवेशाच्या आशा अधिक बळकट केल्या आहेत. बुधवारी 4 बाद 147 अशी मजल मारणाऱया विदर्भला आज यश राठोडच्या दीडशतकी खेळीने आणखी मजबूत स्थितीत नेत अपेक्षेप्रमाणे संघाची धावसंख्या चारशेपार नेली. बुधवारी 4 बाद 56 अशा संकटात असलेल्या विदर्भला सावरणाऱया यश राठोड – कर्णधार अक्षय वाडकरने पाचव्या विकेटसाठी 158 धावांची भागी रचत संघाच्या डावाला सुस्थितीत आणले.
शम्स मुलानीची प्रभावी फिरकी
शम्स मुलानीने विदर्भच्या आघाडी रोखण्यासाठी जोरदार फिरकी मारा केला. त्यानेच बुधवारच्या नाबाद जोडीला फोडले. अक्षय वाडकरच्या 202 चेंडूंतील 52 धावांच्या कासवछाप खेळीचा त्रिफळा उडवला, पण त्यानंतर यश रावडी राठोडसारखा मुंबईशी लढला. त्याने झुंजार आणि आक्रमक खेळ करत 292 धावांपर्यंत नेले. एकीकडे शम्सने 3 विकेट बाद करून विदर्भाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या धावांना वेसण घालू शकला नाही. शम्सने 85 धावांत 6 विकेट टिपल्या, पण विदर्भच्या डावाचा शेवट तनुष कोटियनने यश राठोडची विकेट काढून केला.
हर्ष दुबेची जोरदार सुरुवात
मुंबईसमोर अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी 406 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. ते गाठण्याच्याच ध्येयाने मुंबईचे सलामीवीर आयुष म्हात्रे आणि आकाश आनंद मैदानात उतरले, पण ही जोडी मुंबईला समाधानकारक सलामी देऊ शकले नाहीत. हर्ष दुबेने म्हात्रेचा त्रिफळा उडवत मुंबईला पहिला धक्का दिला आणि दोन षटकानंतर सिद्धेश लाडचीही विकेट काढत मुंबईची 2 बाद 37 अशी अवस्था केली. त्यानंतर सलामीवीर अक्षय आनंद आणि अजिंक्य रहाणेकडून नाबाद खेळाची अपेक्षा होती, पण पार्थ रेखाडेने रहाणेचा (12) अडथळा दूर करत मुंबईला हादरवले. पुढे आकाश आणि शिवम दुबेने विदर्भला आणखी यश मिळू दिले नसले तरी मुंबईला शेवटच्या दिवशी 323 धावांचा आक्रमकपणे पाठलाग करावा लागणार आहे. फिरकीला मदत करणाऱया खेळपट्टीवर आकाश आनंद, शिवम दुबेसह सूर्यकुमार यादव, रॉयस्टन डायसह तळाला येऊन मुंबईसाठी संकटमोचकाची भूमिका निभावणाऱया शम्स मुलानी, तनुष कोटियन आणि शार्दुल ठाकूर यांना ‘करो या मरो’च्या आवेशातच फटकेबाजी करावी लागणार आहे. सामना अनिर्णित सुटला तरी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भ अंतिम फेरी गाठणार, हे निश्चित आहे. हेच चित्र बदलण्यासाठी मुंबईला झुंजार आणि आक्रमक खेळाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.