मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषण वाढले असतानाच आता दुपारचा प्रचंड उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे मुंबईची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमध्ये सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही थंडीची चाहूल लागताच आजारांना निमंत्रण मिळाले आहे. हवेमध्ये आर्द्रता वाढल्याने धुलीकन वातावरणात जास्त वेळ टिकून राहत असल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत दिवसा धुरक्याचे प्रमाण वाढत असल्याने श्वसनाचे आजार वेगाने पसरत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पालिकेने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेची प्रमुख रुग्णालये केईएम, शीव, नायर, कूपरसह 16 उपनगरीय रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधसाठा, आरोग्य सुविधाविषयक साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आली आहेत.
अशी घ्या काळजी
.नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये
.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये
. लक्षणे असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करा
.रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे
.नियमित हात धुवावेत, गर्दीत जाऊ नये, मास्क वापरावा
.शिंकताना नाकावर रुमाल धरावा
तामीळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये आठवडाभरापूर्वी आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबई किनारपट्टीवरही जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱया दमट वाऱयामुळे कधी गारवा तर कधी उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार दिवसांत ही स्थिती पूर्ववत होऊन नियमित गारवा निर्माण होण्याचा अंदाज आहे.
सुषमा नायर, हवामान विभाग, मुंबई
पालिकेच्या शीव रुग्णालयात दररोज सात हजार रुग्ण ओपीडीमध्ये येतात. यामध्ये 25 टक्के रुग्णांची वाढ झाली असून सर्दी, ताप आणि व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांत आवश्यक बेड आणि औषधोपचार उपलब्ध करण्यात आले आहेत.
डॉ. मोहन जोशी, डीन, शीव रुग्णालय