सावधान! शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होतेय फसवणूक, 4 महिन्यांत 266 घोटाळे समोर

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनो सावधान… शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या फसवणुकीच्या प्रकाराला अनेकजण बळी पडत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवून फसवणुकीचे डिजिटल पेंडामिक सुरू असल्याचे चित्र आहे.

एका मोठ्या सरकारी कंपनीतून निवृत्त झालेले शिशीर कुमार (वय 72, नाव बदललेले) हे ऑनलाइन ट्रेडिंग करण्यासाठी उत्सुक होते. एक दिवस फेसबुकवर त्यांना एक जाहिरात दिसली आणि त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक करताचा त्यांचा मोबाइल नंबर व्हॉट्सअॅपवरील एका दलाल स्ट्रीट ट्रेडर्स ग्रुपमध्ये अॅड झाल्याचे समोर आले. व्हॉट्सअॅप ग्रुप एका जोडप्याचा होता, ज्यांनी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉइन झाल्यानंतर कुमार यांचे एक ट्रेनिंग सेशन झाले. त्यानंतर त्या कंपनीतील त्यांचे जे मेंटॉर होते त्यांनी कुमार यांना संबंधित पोर्टलवर जाऊन गुंतवणूक करा आणि आपली रक्कम दुप्पट करा, असे सांगितले. यानंतर कुमार यांनी 40 लाख रुपये गुंतवले. पण पैसे काढालायला गेले तेव्हा दीड लाख रुपयेच काढता आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले.

कुमार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पण शेअर बाजार गुंतवणुकीच्या या घोटाळ्यात बळी ठरलेल्या अनेकांपैकी कुमारही एक होते. या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 266 जणांना गंडवल्याचे समोर आले आहे. या तुलनेत गेल्या वर्षभरात अशाच प्रकरणांच्या 80 तक्रारी दाखल झाल्या होत्या. क्रेडिट कार्ड घोटाळ्यानंतर आता गुंतवणुकीचा मोठा घोटाळा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या वर्षी एप्रिल अखेरपर्यंत गुंतवणूक घोटाळा प्रकरणात 78 जणांना अटक करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक अशा घोटाळ्यांना पहिले बळी ठरत आहेत. ‘या घोटाळ्यात आपली निवृत्तीची सर्व रक्कम बुडाली. आता मी प्रचंड तणावात आहे. आणि रात्र रात्र झोप लागत नाही. आता आम्ही मुलीकडे राहतोय. आपल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत गुन्हेगाराच्या बँक खात्यातील 8 लाखाची रक्कम गोठवली आहे’, असे कुमार यांनी सांगितले.

अशी केली जाते फसवणूक?

गुन्हेगार सोशल मीडियावर खोटे अकाउंट बनवतात. त्यानंतर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किंवा एखादा मोठ्या गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. त्यानंतर नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात. आपल्या जाळ्यात आल्यानंतर गुन्हेगार नागरिकांना कमीत कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवतात आणि जास्तीत जास्त रक्कम गुंतवण्यास सांगतात अन् फसवणूक करतात, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. असा प्रकार कुमार यांच्यासोबतही झाल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

अशा प्रकरणात बहुतेकदा नागरिकांना आधी अॅप डाउनलोड करायला सांगितलं जातं किंवा पोर्टलवरून आपल्या गुंतवणुकीचा पाठपुरवा करण्यास सांगण्यात येतं. मुंबईतील वांद्रेमधील एका व्यापाऱ्याने अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक केली आणि त्याची 5 कोटी रुपयांची फसवणूक झाली. अशाच प्रकारे मुंबई उपनगरातील एका वाईन शॉप मालकाची 6 कोटींची फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांना फार उशीरा कळते. यामुळे फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावध राहा. अशा अॅपची आणि पोर्टलची यादीही सीईआरटीकडे दिली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.