
मोबाईल हा प्रत्येकाच्या अमूल्य आठवणींचा खजिना बनला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मोबाईलला जिवापाड जपत असतो. मौल्यवान ऐवजांच्या बाबतीतदेखील तसेच असते. पण एकदा का हे हरवले अथवा चोरीला गेले की परत मिळेलच याची काही शाश्वती नसते. मात्र हा समज खोटा ठरवत परिमंडळ-9 अंतर्गत येणाऱ्या पोलिसांनी पश्चिम उपनगरात राहणाऱ्या 184 नागरिकांना त्यांचे मौल्यवान ऐवज परत करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. तब्बल तीन कोटी दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला.
या 184 नागरिकांपैकी कोणाचा मोबाईल, कोणाचे मौल्यवान दागिने, महागडे घड्याळ, किमती ऐवज, रोख रक्कम चोरीला अथवा गहाळ झाले होते. त्यामुळे या सर्वांनी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दिल्या होत्या. परिमंडळ-9 चे उपायुक्त दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्याच्या पथकांनी कसून तपास करीत या 184 नागरिकांचा ऐवज परत मिळवला. आज जुहू येथे एक भव्य कार्यक्रम आयोजित करून दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त परमजितसिंह दहिया, दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते संबंधितांच्या चीजवस्तू त्यांना परत करण्यात आल्या.
मोबाईल चोरीला गेला होता. तो परत मिळेल अशी आशाच सोडली होती. मोबाईलमध्ये फोटो, महत्त्वाचे दस्ताऐवज होते. त्यामुळे मोबाईल गेल्याने नुकसान झाले असे वाटत होते; परंतु पोलिसांनी आमचा मोबाईल परत मिळवून देत आम्हाला सुखद धक्का दिल्याचे मोबाईलधारकांनी सांगितले. तर पै पै जमवून दागिने बनवले होते. ते चोरीला गेल्याने मोठा फटका आम्हाला बसला होता. ते परत मिळतील याची अजिबात शाश्वती नव्हती, पण पोलिसांनी ते परत मिळवून देत आम्हाला मोठा दिलासा दिला असेही सांगण्यात आले.