
क्रेडिट कार्ड चार्ज बंद करण्याच्या नावाखाली ठगाने रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) च्या जवानाला गंडा घातला आहे. 1 लाख 39 हजार रुपयाची फसवणूक प्रकरणी नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे आरपीएफमध्ये जवान म्हणून काम करतात. ते मुलुंड येथे कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने त्याना खासगी बँकेच्या क्रेडिटकार्डवर काही चार्जेस लागले आहेत का अशी विचारणा केली. तेव्हा त्याने कोणते चार्जेस अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने तुमचे क्रेडिट कार्ड हे लाईफ टाइमसाठी फ्री आहे. त्यामुळे ते आता चार्ज लागणार नाही. ते तुम्हाला बंद करायचे आहे का, अशी विचारणा केली. ते बंद करण्यासाठी काय करावे लागेल अशी त्याने ठगाला विचारले. ठगाने त्याना भूलथापा मारून प्रोसेस केल्यावर एक ओटीपी येईल असे सांगितले. त्याने ओटीपी देण्यास नकार दिला. नकार दिल्यावर ठगाने तो बँकेचा कर्मचारी असल्याचे असे सांगून विश्वास संपादन केला.
जर ओटीपी शेअर करणार नसाल तर मोबाईलवर लिंक पाठवतो. त्यावर माहिती भरून पाठवून देण्यास सांगितले. त्या लिंकवर क्लिक करून माहिती भरली. माहिती भरल्यानंतर त्याच्या खात्यातून 1 लाख 39 हजार रुपये काढले गेले. पैसे गेल्याचे लक्षात येताच त्याने त्या नंबरवर फोन केला. ठगाने ते पैसे क्रेडिट कार्डमध्ये जमा होईल अशा भूलथापा मारल्या. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने बँकेत जाऊन चौकशी केली, तेव्हा त्याच्या क्रेडिट कार्डवरून व्यवहार झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याप्रकरणी त्याने नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.