
मालाड येथील एक घरफोडी करून 36 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून लंपास झालेल्या सराईत चोराला मालाड पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले. जोगेश्वरी येथील रेल्वे पटरीवर दीड किमी पाठलाग करून पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मालाडमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरात चोरी झाली होती. रात्रीच्या सुमारास पाइपने वर चढून चोरटा खिडकीवाटे घरात घुसला होता. घरात सगळे झोपलेले असताना त्याने शिताफीने कपाटाचा लॉक तोडून 36 लाख 40 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करून मालाड पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने एआयच्या सहाय्याने ते स्पष्ट करण्यात आले. तेव्हा आरोपी हा रेकॉर्डवरचा आरोपी संतोष चौधरी ऊर्फ वैतू (23) हा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कामाठीपुरा, जोगेश्वरी, आंबोली, अंधेरी, वांद्रे या ठिकाणी शोध घेण्यात आला, पण तो सापडला नाही. अखेर तो जोगेश्वरी रेल्वे पटरीलगत असलेल्या एका कच्च्या झोपडीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस तेथे गेले असता त्यांना बघून संतोष पळू लागला. पोलिसांनी दीड किमी पटरीवर त्याचा पाठलाग करून पकडले. संतोषविरोधात विविध पोलीस ठाण्यांत 30 गुह्यांची नोंद आहे.