शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वृद्धाची 36 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. हैदर अब्दुल कादर सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे एका खासगी इन्पह्टेक कंपनीमधून निवृत्त झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात सोशल मीडिया अकाउंट तपासत असताना एका लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक केल्यावर आयडी पासवर्ड टाकल्यावर मोबाईलमध्ये एका वित्त पुरवठा करणाऱया कंपनीचे अॅप्स डाऊनलोड झाले. ते अॅप्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मप्रमाणे दिसत होते. त्यामध्ये विविध कंपनींच्या आयपीओची माहिती दिसत होती. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडले. त्या ग्रुपमध्ये ट्रेडिंगनुसार टिप्स दिल्या जात होत्या.
ठगाने त्याना आयपीओ खरेदी करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने 36 लाख 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यावर त्याना अॅप्सवर फायदा दिसत होता. त्यामुळे त्याने ती रक्कम काढायची ठरवली. ती रक्कम निघत नव्हती. रक्कम काढायची असल्यास आणखी 30 लाख रु. भरावे लागतील असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने चौकशी केली. तेव्हा त्या नावाचा कर्मचारी कंपनीत नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हैदरला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.