
एमबीएसाठी येऊ घातलेल्या प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवून देऊ, जेणेकरून त्या आधारे तुम्हाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल अशी बतावणी करीत प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना संपर्क साधून त्यांच्याकडे 15 ते 20 लाखांची मागणी करणाऱ्या चार जणांचा डाव मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला. विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याआधीच पोलिसांनी त्या चौघांना दिल्लीतून उचलले.
एमबीए, एमएच सीईटी परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या उमेदवारांची माहिती चोरून अज्ञात व्यक्तींनी राज्यातील 72 उमेदवारांना संपर्क साधला. तुम्हाला नामांकित महाविद्यालयांमध्ये अॅडमिशन मिळवून देण्याकरिता पर्सेंटाईल वाढवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. हॉलतिकीट मिळाल्यावर ते आम्हाला द्या, त्या आधारे सिस्टम हॅक करून पर्सेंटाईल वाढवून देऊ असे सांगत त्यांनी 15 ते 20 लाखांची मागणी विद्यार्थ्यांकडे केली असल्याची तक्रार राज्याच्या सीईटी सेलने मुंबई पोलिसांकडे केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर, निरीक्षक सुनीता भोर, सपोनि जयदीप जाधव, उपनिरीक्षक विजय बेंडाले, सुजित घाडगे व पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करून पोलिसांनी दिल्लीतून चौघांना उचलले. त्यातील तिघे हे बिहारचे राहणारे असून एक गुडगावचा रहिवासी आहे. शिवाय त्यापैकी दोघे एनआयटीचे शिक्षण घेत असून एक यूपीएससीची तर चौथा बीएससीची तयारी करीत आहे.
परीक्षा केंद्रासाठी त्या चार जिह्यांची नावे द्या
परीक्षेसाठी गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि जालना या चार जिह्यांची नावे द्या. तेथील परीक्षा केंद्र आल्यानंतर तुमचे हॉलतिकीट आम्हाला द्या. प्रत्यक्ष परीक्षेवेळी आम्ही सिस्टम हॅक करू आणि ऑनलाईन पेपर सोडवू. त्यातून तुम्हाला चांगले पर्सेंटाईल मिळतील आणि मग त्याआधारे नामांकित महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश मिळवणे सहज सोपे होईल अशी बतावणी त्या भामट्यांनी केली होती. त्यांनी अशा प्रकारे आणखी किती लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.