
सायबर भामट्यांनी दक्षिण मुंबईतील एका 86 वर्षीय महिलेला टार्गेट केले. शिताफीने भीती दाखवत आरोपींनी त्या वृद्धेला डिजिटल अटक करत त्यांच्याकडून तब्बल 20 कोटी 26 लाख रुपये उकळले. अखेर या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने पाच जणांना अटक करून आतापर्यंत 77 लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात गोठवली आहे.
दक्षिण मुंबईत राहणाऱ्या दीपाली (नाव बदललेले) या 86 वर्षीय वृद्धेला सायबर भामट्यांनी डिजिटल अॅरेस्ट केली होती. 26 डिसेंबर ते 3 मार्च या कालावधीत आरोपींनी डिजिटल अॅरेस्ट करून दीपाली यांच्याकडून तब्बल 20 कोटी 26 लाख रुपये उकळले. दीपाली यांनीदेखील भीतीपोटी एवढी रक्कम आरोपी सांगतील त्या बँक खात्यात पाठविली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच दीपाली यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भोये, सपोनि खरोटे व पथकाने तपास सुरुवात करून पाच जणांना अटक केली.
अजून काही आरोपींनी अटक होण्याची शक्यता
तांत्रिक बाबींच्या आधारे अचूक तपास करत पथकाने आतापर्यंत या गुह्यात शायन शेख (20), राजीक बट्ट (20), ऋतिक ठाकूर (25) या तिघांसह एकूण पाच सायबर भामट्यांना अटक केली. शिवाय पोलिसांनी दीपाली यांच्याकडून आरोपींनी उकळलेली 77 लाखांची रोकड बँक खात्यांमध्ये गोठवण्याची कामगिरी केली. याप्रकरणी आणखी तपास सुरू असून अजून आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.